Anil Ambani Stock:  गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांची कंपनी रिलायन्स पॉवर (Reliance Power) चांगलीच तेजीत आहे. या कंपनीचा शेअर सध्या चांगलाच भाव खात असून त्याचे मूल्य गेल्या काही दिवसांपासून सतत वाढते आहे. अनेक गुंतवणूकदार या कंपनीच्या शेअरमध्ये (Share Market) मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. एका आठवड्यात या कंपनीचा शेअर तब्बल 45 टक्क्यांनी वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर ही कंपनी सध्या एवढी चर्चेत का आहे? गुंतवणूकदार या कंपनीत सध्या गुंतवणूक का वाढवत आहेत? असे विचारले जात आहे. 


रिलायन्स पॉवर या कंपनीच्या शेअरचे मूल्य एका आठवड्यात 45 टक्क्यांनी वाढले आहे. या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 14 जून रोजीदेखील या कंपनीच्या शेअरचा आलेख चांगलाच चढा होता. दुपारपर्यंत या कंपनीचा शेअर 31.85 रुपयांपर्यंत गेला होता. गुरुवारी (13 जून) तर या शेअरला थेट अप्पर सर्किट सागले होते. गुरुवारी सकाळच्या सत्रातच हा शेअर 5 टक्क्यांनी वाढला होता. गेल्या पाच सत्रांत हा शेअर 23 टक्क्यांनी तेजीत होता. 


शेअरचे मूल्य आधी काय होते? आता नेमके काय आहे? (Reliance Power share price analysis)


सध्या रिलायन्स पॉवर या शेअरचे मूल्य वाढताना दिसतेय. 5 जून रोजी या शेअरचे मूल्य 23.50 रुपये होते. त्यानंतर या शेअरमध्ये सातत्याने वाढ झालेली आहे. या आठवड्यात हा शेअर 34.45 रुपयांच्या 52 आठवड्यांतील सर्वोच्च स्तरावर पोहोचला. एका आठवड्यात हा शेअर साधारण 46.60 टक्क्यांपर्यंत वाढला.  


शेअर वाढण्याचं नेमकं कारण काय? (What is reason for Reliance Power increase)


या शेअरचे मूल्य एवढे का वाढले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याची दोन प्रमुख कारणं आहेत. यातील पहिलं कारण म्हणजे या कंपनीने आपल्या डोक्यावरील कर्ज कमी केले आहे. सध्या ही कंपनी वेगाने कर्जाची परतफेड करत आहे. या कंपनीवर वेगवेगळ्या बँकांचे साधारण 800 कोटी रुपयांचे कर्ज होते. रिलायन्स पॉवरने या सर्व कर्जाची परतफेड केली आहे. दुसरं कारण म्हणजे देशात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीए सरकारची स्थापना झालेली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून एनडीए सरकारचा उर्जा क्षेत्रावर विशेष भर आहे. त्यासाठी वेगवेगळी धोरणं अवलंबली जात आहेत. त्यामुळेदेखील उर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या आणि या कंपन्यांत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांत सध्या सकारात्मक वातावरण आहे. याच कारणांमुळे गेल्या काही दिवसांत रिलायन्स पॉवर ही कंपनीदेखील शेअर बाजारात चांगली कामगिरी करताना दिसतेय. 



(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


मुंबईतील 21 एकरचा भूखंड अदानींना गिफ्ट, शासनाचा GR निघाला; काँग्रेसचा आरोप, कडाडून विरोध


आता केवळ 70 रुपयांमध्ये Amazon Prime चं सब्सक्रिप्शन; त्यासाठी नेमकं काय करावं लागेल? जाणून घ्या


मोठी बातमी! अदानी समुहानं केली 'या' मोठ्या कंपनीची खरेदी, 10422 कोटींचा व्यवहार