मुंबई : म्हाडाकडून (Mhada Lottery 2024) मुंबईत  2030 तर सिडकोकडून (Cidco Lottery 2024) नवी मुंबईत 902 घरांसाठी लॉटरी काढण्यात आलेली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड गृहनिर्माण प्रकल्पामध्ये घरं उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. तर, नवी मुंबईत सिडकोकडून कळंबोली, खारघर आणि घणसोली व्हॅलीशिल्प, स्वप्नपूर्ती आणि वास्तूविहार सेलीब्रेशन येथील 902 घरं उपलब्ध आहेत. म्हाडाच्या आणि सिडकोच्या घरांसाठी किती रक्कम अनामत म्हणून भरावी लागेल हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.  


म्हाडानं मुंबईतील 2030 घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. म्हाडानं अर्ज नोंदणीला मुदतवाढ देऊन ती 19 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.  म्हाडाच्या घरांसाठी अर्जाचं शुल्क 590 रुपये आहे. तर अनामत रक्कम 10 हजार, 25 हजार, 50 हजार, 1 लाख, 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंत आहे. ही रक्कम अत्यल्प, अल्प, मध्यम, उच्च उत्पन्न गट आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांसाठी आहे. 
 
सिडकोच्या घरांसाठी अर्जाचं शुल्क जीएसटीसह 295 रुपये निश्चित करण्यात आलं आहे. तर ईडबल्यूएस प्रवर्गासाठी 75 हजार रुपये आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी दीड लाख रुपये अनामत रक्कम भरावी लागेल. सिडकोच्या घरांसाठी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 27 सप्टेंबर आहे. 


म्हाडाकडून घरांच्या दरात कपात   


मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड गृहनिर्माण प्रकल्पामध्ये विविध उत्पन्न गटातील 2030 घरं सोडतीसाठी उपलब्ध करण्यात आली होती. म्हाडानं या घरांपैकी 370 घरांच्या किमतीत 10 लाख ते  12 लाख रुपयांची कपात केली आहे.  म्हाडानं 2030 घरांपैकी 370 घरांच्या दरात 10  ते 12 लाख रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला.  या घरांसाठी नोंदणी आणि अर्ज भरण्याची अंतिम मुदत 4 सप्टेंबर निश्चित केली होती ती मुदत वाढवून 19 सप्टेंबर करण्यात आली आहे. 


मुंबई आणि नवी मुंबईत घर घेण्याची संधी


म्हाडानं मुंबईतील 2030 घरांसाठी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ दिली आहे. तर, नवी मुंबईतील सिडकोच्या घरांसाठी अर्ज सादर करण्यासाठी साधारणपणे एक महिन्याचा वेळ आहे. त्यामुळं ज्यांना मुंबई आणि नवी मुंबईत घर घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.  म्हाडानं मुदतवाढ दिल्यानं अनेकांना अर्ज दाखल करण्याची संधी मिळणार आहे. 26 दिवसांचा वेळ मिळाल्यानं अनेकांना कागदपत्र जमवण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या दूर होऊन अर्जदारांची संख्या वाढू शकते. 


इतर बातम्या :


Mhada Lottery 2024: मुंबईतील 370 घरं 10 ते 12 लाखांनी स्वस्त केली, आता म्हाडा आणखी एक महत्त्वाचा निर्णय, मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा


सर्वांसाठी परवडणारी घरं बनवणार, देवेंद्र फडणवीसांचा शब्द, म्हाडाची घरं 10 ते 15 लाखांनी स्वस्त!