Mumbai MHADA Home Prices : मुंबई : मुंबईत घर घेण्याचं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. पण, सध्या म्हाडाच्या घरांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. म्हाडाच्या लॉटरीतील घरांच्या किमती एवढ्या असतील, तर सर्वसामान्यांचं घर घेण्याचं स्वप्न कसं पूर्ण होणार? असा प्रश्न चर्चेत होता. अशातच आता, म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या किमतींत 10 ते 25 टक्क्यांची घट करण्यात आली, तर 62 लाखांचं घर 50 लाखांत, 39 लाखांचे घर 29 लाखांत मिळणार आहे. तसेच, खासगी विकासकांकडून निर्माण केलेल्या 370 घरांची किंमत कमी होणार असल्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री अतुल सावेंनी केली आहे. तसेच, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनीही म्हाडाच्या घरांच्या किमतींत घट करत असल्याची घोषणा केली आहे. 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केलंय की, मुंबईकरांसाठी खुशखबर, सध्याच्या मुंबई लॉटरीसाठी घोषित किमतीवर म्हाडाच्या घरांच्या किमतीत कपात करण्यात आल्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. हे फक्त कलम 33(5) आणि 33(7) अंतर्गत प्राप्त झालेल्या अतिरिक्त सदनिकांना लागू होते. सुधारित कपात अशी असेल, EWS: 25%, LIG: 20%, MIG: 15%, HIG: 10% सर्वांसाठी घरे अधिक परवडणारी बनवणे!"






मुंबईतील म्हाडाच्या घरांची सोडत लांबणीवर 


मुंबईतील घरांसाठी म्हाडाची लॉटरी जाहीर झाली आणि स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांनी घर घेण्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात केली. पण, घरांसाठी ज्यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यांना आता सोडतीची उत्सुकता लागली आहे. अशातच आता अर्जदारांना सोडतीसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळानं घरांसाठी नोंदणी आणि अर्ज करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ दिली गेल्यानं इच्छुकांना आता 19 सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करता येईल. मुदतवाढ दिलेल्या कालावधीत अर्ज आणि अनामत रक्कम सादर करावं लागेल. म्हाडाच्या सोडतीचा यापूर्वीचा दिनांक 13 सप्टेंबर होता, मात्र अर्ज  सादर करण्यास मुदतवाढ दिल्यानं ती देखील लांबणीवर गेली असून त्याची नवीन तारीख लवकरच जाहीर होईल, अशी माहिती आहे. 


मुंबई म्हाडा लॉटरीतील घरं कुठे कुठे? 


मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड गृहनिर्माण प्रकल्पामध्ये विविध उत्पन्न गटातील 2030 घरं सोडतीसाठी उपलब्ध करण्यात आली होती. म्हाडानं या घरांपैकी 370 घरांच्या किमतीत 10 लाख ते  12 लाख रुपयांची कपात केली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Mhada Lottery 2024: मुंबईतील 370 घरं 10 ते 12 लाखांनी स्वस्त केली, आता म्हाडा आणखी एक महत्त्वाचा निर्णय, मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा