Share Market Latest News:  भारतीय शेअर बाजारासाठी आजचा (15 जून 2023) दिवस खूप खास ठरला. शेअर बाजारातील तेजीमुळे मुंबई शेअर बाजारावर (BSE) सूचीबद्ध  असलेल्या कंपन्यांच्या बाजार भांडवलाने (Market Capitalization) 291.89 लाख कोटी रुपयांचा ऐतिहासिक विक्रमी उच्चांक गाठला. यापूर्वी, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 14 डिसेंबर रोजी 291.30 लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते.  हा आकडा आतापर्यंतचा सर्वाधिक होता.


20 मार्च 2023 नंतर परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा गुंतवणूक (Investment) करण्यास सुरुवात केली. त्याच्या परिणामी मागील तीन महिन्यांपासून शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. तीन महिन्यात शेअर बाजारात असलेल्या तेजीमुळे बाजार भांडवलात वाढ झाली आहे. मागील तीन महिन्यात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत जवळपास 37 लाख कोटींची वाढ झाली आहे. 


20 मार्च 2023 रोजी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 57 हजार अंकांच्या पातळीपर्यंत घसरला होता. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) हा 16,828 अंकांच्या पातळीपर्यंत घसरला होता. या स्तरांवरून सेन्सेक्सने 6,000 हून अधिक अंकांची आणि निफ्टीने 1900 हून अधिक अंकांची झेप घेतली आहे. म्हणजेच गेल्या तीन महिन्यांत दोन्ही निर्देशांकांमध्ये 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 


परदेशी आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे, मुंबई शेअर बाजारावर (BSE) सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 20 मार्च 2023 पर्यंत 255.64 लाख कोटी रुपयांवर खाली आले होते. तेच बाजार भांडवल आता 291.89 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच या काळात बाजारात गुंतवलेल्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 36.25 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.


भारतीय शेअर बाजाराला परदेशी गुंतवणूकदारांचा मोठा आधार मिळाला आहे. मार्चनंतर एप्रिल आणि मे महिन्यातील किरकोळ महागाईच्या आकडेवारीत घसरण झाल्याने बाजारात तेजी असल्याचे दिसून येत आहे. आरबीआयने एप्रिल आणि जूनमध्ये दोन पतधोरण बैठका घेतल्या. या पतधोरण बैठकीत व्याजदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. आता अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेड रिझर्व्हने 15 महिन्यांत प्रथमच कर्ज महाग केले नाही. याच कालावधीत, 2022-23 साठी जीडीपीचे आकडे 7.2 टक्क्यांवर आले आहेत. अपेक्षेपेक्षा हे आकडे अधिक चांगले आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीही खाली आल्या आहेत. या सर्व गोष्टींचा बाजारावर सकारात्मक परिणाम झाला आहे, त्यामुळे ही तेजी आली आहे, ज्याचा गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: