Ashadhi Wari 2023 : माउलीच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाल्यानंतर इतर भक्तांच्या पालख्याही पंढरीकडे मार्गस्थ होत आहेत. आज वारकरी संत प्रभावळीतील महत्वाच्या संत जनाबाई (Sant Janabai) यांच्या पालखीचे त्यांचे जन्मगाव परभणीच्या गंगाखेड येथून पंढरपूरकडे भाविकांसह प्रस्थान झाले.


गोदावरी काठावर वसलेले गंगाखेड हे संत जनाबाई यांचे जन्मगाव आहे. इथून संत मोतीराम महाराज यांच्या प्रेरणेने 45 वर्षापूर्वी पासून संत जनाबाई यांच्या पालखीला सुरुवात करण्यात आली होती. ती परंपरा आजही कायम असून आज संत जनाबाई यांच्या मंदिरापासून टाळ मृदंगासह हरिनामाच्या गजरात या पादुका आणि पालखीची शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. गंगाखेड-परळी-अंबाजोगाई-उस्मानाबाद असा पायी प्रवास करत ही पालखी पंढरपूरला पोहचते. तर प्रतिवर्षी या पालखीची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढत चालली असून पंचक्रोशीतील वारकऱ्यांची मांदियाळी ही पालखी झाली आहे.


दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे संत जनाबाई यांची पालखीने परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथून पंढरपूरकडे आज प्रस्थान केले. गंगाखेड शहरातील गोदावरी काठावर संत जनाबाई यांचे जन्मस्थान असल्याने याच  ठिकाणावरून गेल्या अनेक वर्षांपासून ही पालखी पंढरपूरला जाते. ज्यात घोडे, बैलगाडी आणि वारकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळतो.


दरम्यान जून महिन्यातील 15 दिवस उलटले असून देखील मराठवाड्यातील अनेक भागात अजूनही पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे लवकरात लवकर चांगला पाऊस होऊन बळीराजाचं प्रश्न मिटावा या प्रार्थनेसह हजारो वारकऱ्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे.  तर संत जनाबाईच्या पालखीमध्ये गंगाखेड तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. तर पुढील अकरा दिवस प्रवास करत ही पालखी पंढरपूरला पोहोचणार आहे.


पंढरपूरसाठी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी... 


आषाढी एकादशीनिमित्त छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि आदिलाबाद येथून पंढरपूरसाठी दररोज तीन विशेष रेल्वे 25 जून ते पाच जुलै दरम्यान दररोज चालवण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे. यासंदर्भाचे निवेदन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या प्रबंधक नीती सरकार यांच्याकडे देण्यात आले आहे. पंढरपूर यात्रेसाठी 25 जून ते 5 जुलै दरम्यान, छत्रपती संभाजीनगर-पंढरपूर, अकोला- पंढरपूर आणि आदीलाबाद-पंढरपूर अशा तीन विशेष रेल्वे चालवण्यात याव्यात, नियमित निजामाबाद- पंढरपूर गाडीला पाच अतिरिक्त डब्बे या काळात जोडण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली. निवेदनावर मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, राजेंद्र मुंडे, रितेश जैन, डॉ. राजगोपाल कालानी, बाळासाहेब देशमुख, शिवलिंग बोधने, माणिक शिंदे, कदिरलाला हाश्मी, दत्तात्रय कराळे, विठ्ठल काळे, रुस्तुम कदम प्रकाश लाखरा, दयानंद दीक्षित, श्रीकांत गडपा आदींनी केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Ashadhi Wari 2023 : श्री संत सोपान काका महाराजांच्या पालखीचं प्रस्थान; पांगरेमध्ये आजचा मुक्काम