Maharera: मुंबई : कायद्यानं दोष दायित्व कालावधीमुळे घरबांधणीत राहिलेल्या त्रुटी दुरूस्त करण्याची सोय असल्यानं ग्राहकांचं हित जपलं जात असलं तरी, मुळात अशी वेळच येऊ देणं योग्य नाही. त्यासाठी आधीच बांधकामांबाबत प्रमाणित कार्यपद्धती ठरवून, मानकंही ठरवावी. जेणेकरून उत्तम गुणवत्तेचं काम होऊन ग्राहकही समाधानी राहतील. यासाठी महारेरानं पुढाकार घेतला असून स्थावर संपदा क्षेत्रातील गुणवत्ता आश्वासन अहवालाचा आराखडा (Framework For Quality Assurance Reporting) विकसित करण्यासाठी सर्व विकासकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या स्वंयंविनियामक संस्थांना पत्र लिहून त्यांच्या सूचना मागविल्या आहेत. अतिरिक्त खर्च करून दोष दूर करत बसण्यापेक्षा अशा तक्रारी मुळातच उद्भवू नये यासाठी आधीच बांधकाम पातळीवर काय करता येईल? कशी काळजी घेता येईल? त्यासाठी सुनिश्चित कार्यपद्धती कशी ठरवायची? त्यात कुठल्या कुठल्या बाबींचा समावेश ठेवायचा? त्यासाठीचे मापदंडही कसे ठरवायचे? याबद्दल महारेराकडे 31 ऑक्टोबरपर्यंत सूचना पाठवण्याची विनंती केलेली आहे. त्यांनी या सूचना suggestios.maharera@gmail.com या ईमेलवर पाठवायच्या आहेत. 


या सूचना आल्यानंतर महारेरा त्यावर आधारित एक सल्लामसलत पेपर (Cosultation Paper ) तयार करून तो सर्वांच्या सूचनांसाठी जाहीर करेल आणि त्याबाबतची पुढील कारवाई करेल. यात विकासकांनी दर 6 महिन्याला  प्रकल्पाच्या बांधकामात कुठल्या दर्जाचे साहित्य वापरले (यात सिमेंट, स्टील, रेती अशा सर्व बांधकाम सामग्रीचा समावेश अपेक्षित) एकूण काम कशा पद्धतीनं होतं. यातील कुशल कामगारांची भूमिका काय या बाबी संकेतस्थळावर टाकाव्यात. ज्यामुळे ग्राहकांना गुंतवणुकीचा निर्णय घ्यायला चांगली अभ्यासपूर्ण माहिती उपलब्ध होईल. 


कारण कुठल्याही गृहनिर्माण प्रकल्पाची गुणवत्ता ही अनेक घटकांवर अवलंबून असते. यात वापरले जाणारे साहित्य, काम करणाऱ्या कामगारांची कुशलता, एकूण बांधकामाच्या काळात विविध पातळ्यांवर पार पाडल्या जाणाऱ्या प्रक्रिया आणि त्यावर असणारे सुक्ष्म पर्यवेक्षण या घटकांचा  विशेषत्वानं समावेश असतो. हे  घटक परस्पर पूरक असून बांधकाम सामग्री चांगली परंतु वापरणारे योग्य नसणं किंवा कामगार कुशल आहे परंतु सामग्रीचा दर्जा योग्य नाही. शिवाय ज्यांनी या प्रकल्पाच्या एकूण कामा दरम्यान केल्या जाणाऱ्या विविध प्रक्रियांवर सजग राहून लक्ष दिलं नसेल तर? योग्य प्रकारे पर्यवेक्षण केलं नसेल तर? अशा अनेक बाबी प्रकल्पाची गुणवत्ता ठरवत असतात. याबाबत काही सुनिश्चित कार्यपद्धती ठरवून आपल्याला या क्षेत्रात गुणवत्तेचा आग्रह धरून, या क्षेत्राची विश्वासार्हता वाढवायची आहे. त्यासाठीच महारेराने हा प्रस्ताव तयार केला आहे . हा प्रस्ताव प्रभावीपणे राबविण्याचा महारेराचा निर्धार आहे.


स्थावर संपदा अधिनियमातील कलम 14 (3) नुसार प्रकल्पाच्या संरचनेतील कारागिरीतील दोष किंवा खरेदी करारात  मान्य केलेल्या कुठल्याही बाबीतील त्रुटी हस्तांतरणानंतर 5 वर्षांसाठी कुठल्याही अतिरिक्त आकाराशिवाय 30 दिवसांत पूर्ण करण्याचे बंधन दोष दायित्व कालावधीनुसार विकासकावर असते. याची गरजच राहू नये ,यासाठी महारेराने हा प्रस्ताव आणलेला आहे.



महारेराचं उद्दिष्ट काय? 



  • भूखंड, अपार्टमेंट, इमारत किंवा कोणत्याही रिअल इस्टेट प्रकल्पाच्या विक्रीमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणणं

  • रिअल्टी क्षेत्रातील ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणं

  • जलद तक्रार निवारणासाठी समायोजन यंत्रणा कार्यान्वित करणं

  • अपीलांच्या सुनावणीसाठी अपीलीय न्यायाधिकरणाची अंमलबजावणी करणं


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


नवरात्र, दसरा, दिवाळीच्या मुहुर्तावर गृहनिर्माण प्रकल्प सुरू करायचेत? महारेराकडे वेळेत अर्ज करा