Ashish Shelar on Rohit Pawar : महाराष्ट्राच्या जीडीपीबाबत (Maharashtra GDP) फेक नरेटीव्ह पसरवू नका. महाविकास आघाडीच्या (MVA) काळात जीडीपी ( GDP) 13 टक्क्यांपर्यंत घसरला होता. आता महायुतीच्या काळात जीडीपी 13.3 टक्क्यांवर आला असल्याचे मत भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी व्यक्त केलं आहे. आशिष शेलार यांनी केलेल्या आरोपाला रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 


महाराष्ट्राच्या जीडीपीबाबत महायुती सरकारच्या काळात चढती कमान सुरु झाल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला आहे. गुजरात आजही 8 टक्क्यांवर असल्याची आकडेवारी शेलार सादर करत खुलासा केला आहे. गुजरात जीडीपीमध्ये महाराष्ट्राच्या मागेच असल्याचे शेलार यांनी म्हटलं आहे.


आशिष शेलारांच्या ट्वीटमध्ये नेमकं काय? 


श्रीमान रोहित पवार तुम्ही एकतर ना बातमी वाचली, ना हा अहवाल आणि लगेच 'फेक नरेटिव्ह' गॅंगचा सदस्याच्या भूमिकेत गेलात? असा सवाल शेलारांनी उपस्थित केलाय. देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचा GDP महाविकास आघाडीच्या काळात आपण 13 टक्क्यांवर आणून ठेवला (2021) आणि आता 2023 मध्ये तो 13.3 टक्के झाला आहे. चढती कमान आता महायुती सरकारच्या काळात पुन्हा सुरू झाली असल्याचे शेलार म्हणालेत. ज्या गुजरातचा तुम्ही उल्लेख करता तो आजही 8 टक्क्यांवर आहे. महाराष्ट्र त्यापेक्षा कितीतरी पुढे आहे आणि पुढेच राहील. महाविकास आघाडीचे पाप आमच्या माथी मारु नका अशी टीका आशिष शेलारांनी केली आहे.