Lok Sabha Election Survey : लोकसभा निवडणुकीला एक वर्षाचा कालावधी राहिलाय. सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षांनी लोकसभा 2024 ची तयारी सुरु केली. अशातच लोकसभा 2024 बद्दल एक सर्वे समोर आला, यात काँग्रेसला महाराष्ट्रातून दिलासा मिळू शकतो, असे संकेत मिळाले आहेत. सर्वेच्या आकडेवारीनुसार, 2019 लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2024 मध्ये यूपीएला महाराष्ट्रात सहा पटीनं जागा मिळू शकतात. 


सी-व्होटर आणि इंडिया टुडे यांनी नुकताच लोकसभा निवडणुकीबद्दल एक सर्वे करत मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. या सर्वेनुसार, युपीएला महाराष्ट्रात 34 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. गेल्यावर्षी महाविकास आघाडी सत्तेतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासाठी हा सर्वे दिलासादायक आहे. तर हे आकडे सत्ताधारी भाजपचं टेन्शन वाढवणारे आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. 


2019 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या होत्या ? 


2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. 48 जागा असणाऱ्या महाराष्ट्रात काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली होती. तर यूपीएला पाच जागांवर समाधान मानावं लागलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसला 2029 च्या निवडणुकीत चार जागा मिळाल्या होत्या. पण नुकत्याच आलेल्या सर्वेच्या आकडेवारीनुसार, यूपीएच्या जागा चार पटीने वाढण्याची शक्यता आहे. 


2019 मध्ये वेगळं होतं समीकरण?


2019 मध्ये महाराष्ट्रातील राजकीय समीकरण पूर्णपणे वेगळं होतं. तेव्हा शिवसेना भाजपच्या नेतृत्वातील एनडीएचा भाग होती. त्यावेळी एनडीएनं दमदार कामगिरी करत 48 पैकी 42 जागांवर विजय मिळवला होता. पण विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली होती. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केले होते. शिवसेना यूपीएमध्ये सामील झाली पण 2022 मध्ये त्यांना अंतर्गत फूटीचा सामना कारावा लागला. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात 40 आमदारांनी शिवसेनाला रामराम ठोकत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना अद्यापही यूपीएचा भाग आहे. 


सहा महिन्यात वाढल्या जागा -


सत्ता गमावल्यानंतर युपीएला सर्वेच्या आकडेवारीमुळे दिलासा मिळणार आहे. मागील सहा महिन्यात यूपीएनं आपली कामगिरी आणखी सुधारली आहे. सहा महिन्यापूर्वी ऑगस्ट 2022 मध्ये सी व्होटरनं केलेल्या सर्वेत यूपीएला 30 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली होती. 2023 जानेवारीमध्ये आलेल्या सर्वेनुसार, यूपीएला 34 जागा मिळण्याची शक्यता आहे. 
 
मतांची संख्या वाढली -


लोकसभा जागांच्या संख्येसोबतच मतांची संख्याही वाढल्याचं सर्वेतून समोर आलेय. ऑगस्ट 2022 च्या सर्वेनुसार महाहाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीएला 47 टक्के मते मिळण्याचा अंदाज होता. आता आलेल्या सर्वेनुसार, ही संख्या 48 टक्के इतकी झाली आहे.