LPG Price Hiked: या महिन्याच्या सुरुवातलीलाच म्हणजे 1 मार्च रोजी देशातील लोकांना महागाईचा दुहेरी फटका बसला आहे. या महिन्यात एलपीजीच्या घरगुती आणि व्यावसायिक किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. होळीपूर्वीच जनतेला महागाईच्या तडाख्याला सामोरे जावे लागले असून यावरून नागरीक केंद्र सरकारवर टीका करत आहेत. यासोबतच काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. असं असलं तरी याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.


LPG Price Hiked:  एलपीजीच्या दरात 56 टक्क्यांनी वाढ 


अलीकडेच 14.2 किलोच्या घरगुती लिक्विड पेट्रोलियम गॅस (LPG) सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाल्यानंतर सिलिंडरची किंमत 1103 रुपयांवर पोहोचली आहे. मात्र गेल्या चार वर्षांत सिलिंडरच्या किमतीत सुमारे 56 टक्क्यांनी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. घरगुती एलपीजी (LPG) सिलेंडरची किरकोळ विक्री किंमत (RSP) 1 एप्रिल 2019 रोजी 706.50 रुपये होती, जी 2020 मध्ये 744 रुपये, 2021 मध्ये 809 रुपये आणि 2022 मध्ये 949.50 रुपये झाली आहे. यावर्षी 1 मार्च रोजीपासून ही किंमत 1053 रुपयांवरून आता 1103 रुपयांपर्यंत वाढली आहे.


LPG Price Hiked: सबसिडी मध्ये लक्षणीय घट


गेल्या काही वर्षांत घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र सरकारी आकडेवारीवरून असे दिसून येते की, एलपीजीवरील एकूण सबसिडी गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. गेल्या चार वर्षांत सरकारने दिलेल्या एलपीजीवरील सबसिडीच्या तपशीलावरून असे दिसून येते की, 2018-19 मध्ये  37,209 कोटी रुपये सबसिडी होती आणि 2019-20 मध्ये ती 24,172 कोटी रुपये, 2020-21 मध्ये 11,896 कोटी रुपये आणि  2021-22 मध्ये 1811 कोटी रुपये झाली आहे. 


LPG Price Hiked: आंतरराष्‍ट्रीय बाजारात संबंधित उत्‍पादनांच्या किमती वाढल्‍याचा परिणाम


पेट्रोलियम मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील एलपीजीसह पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारातील संबंधित उत्पादनांच्या किमतींशी जोडल्या जातात. सौदी सीपीच्या सरासरी किमती, ज्यावर घरगुती एलपीजी किमती आधारित आहेत, 2019-20 ते 2021-22 दरम्यान 454 अमेरिकन डॉलर्सवरून 693 अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढल्या आहेत. 2022-23 मधील सरासरी सौदी सीपी फेब्रुवारी 2023 पर्यंत 710 डॉलर्सपर्यंत वाढले आहे. मंत्रालयाने अलीकडेच संसदेत दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, सरकार घरगुती एलपीजीच्या प्रभावी किंमतीत सुधारणा करत आहे. देशांतर्गत एलपीजीच्या विक्रीवर सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे.


Pantpradhan Ujjwala Gas Yojana: प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची सध्या काय आहे स्थिती?


गरीब घरातील महिला सदस्यांना एलपीजी कनेक्शन देण्यासाठी 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) सुरू करण्यात आली होती. ज्या अंतर्गत 8 कोटी कनेक्शन देण्यात आले होते. उज्ज्वला 2.0 अंतर्गत सर्व पीएमयूवाय लाभार्थ्यांना मोफत एलपीजी कनेक्शन व्यतिरिक्त पहिल्यांदा गॅस शेगडी देण्यात आली. उज्ज्वला 2.0 अंतर्गत 1 फेब्रुवारी 2023 पर्यंत 1.6 कोटी कनेक्शन देण्यात आले आहेत. कोविड-19 महामारी दरम्यान सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज (PMGKP) अंतर्गत 1 एप्रिल 2020 पासून उज्ज्वला लाभार्थ्यांना तीन मोफत एलपीजी रिफिल देण्याची योजना जाहीर केली.