Most Powerful Indians : इंडियन एक्सप्रेसने देशातील 100 शक्तिशाली व्यक्तींची यादी (Most Powerful Indians) जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून (PM Modi) ते उद्योगपती गौतम अदानीपर्यंत सर्वांचा समावेश करण्यात आला आहे. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचाही टॉप-10 पॉवरफुल लोकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. जाणून घेऊयात या यादीत कोण कोणत्या स्थानावर आहे. 


यावर्षी देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  इंडियन एक्सप्रेसने देशातील टॉप-100 पॉवरफुल व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत राजकारण, व्यवसाय आणि चित्रपट जगतातील लोकांची नावे आहेत. या यादीत टॉप-१० कोण आहेत, त्याबद्दलची माहिती आज आपण पाहणार आहोत. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अग्रस्थानी आहेत.  


1) पंतप्रधान नरेंद्र मोदी अग्रस्थानी


पंतप्रधान नरेंद्र मोदी (  वय, 73 वर्षे) हे अग्रस्थानी आहेत. तिसऱ्यांदा सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधान मोदींचा कौल काळानुसार अधिक मजबूत झाला आहे. सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केले आहे. कल्याणकारी योजनांसह अर्थव्यवस्थेची भक्कम स्थिती झाल्यानंतर राम मंदिराच्या उद्घाटनानंतर मोदी ब्रँड अधिक मजबूत झाला आहे. पीएम मोदींचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर 9 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत.


2) अमित शाह


भाजपच्या यशात अमित शाह ( 59 वर्षे)  यांचे मोठे योगदान आहे. शाह हे पक्षाचे प्रमुख रणनीतीकार मानले जातात. नुकत्याच झालेल्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या हिंदी पट्ट्यातील राज्यांमध्ये भाजपने ज्या प्रकारे विजय मिळवला आहे, त्यानंतर शाह यांचे स्थान आणखी मजबूत झाले आहे. आता भाजपचे लक्ष दक्षिणेकडील राज्यांसह पश्चिम बंगालवर आहे. शाह  यांनी ब्रिटिशांचे तीन कायदे रद्द करून भारतीय न्यायिक संहितेच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा केला आहे, त्यातून संदेश स्पष्ट झाला आहे. शाह यांनी आता आगामी लोकसभा निवडणुकीत 370 हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आता अमित शाहा यांचे पुढचे पाऊल आहे ते नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करणे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर शाह यांचे 3.5 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत.


3) मोहन भागवत 


मोहन भागवत  (73 वर्षे) हे आरएसएसचे सरसंघचालक आहेत. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मोहन भागवत हे पंतप्रधान मोदींसोबत उपस्थित होते. संघ आता भाजपच्या तिसऱ्या टर्मकडे पाहत आहे. मोहन भागवत सोशल मीडियावर सक्रिय नाहीत.


4) CJI DY चंद्रचूड 


न्यायाधीश DY चंद्रचूड  (64 वर्षे)  यांनी त्यांच्या खास पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाचे नेतृत्व केले. निवडणुकीच्या वर्षात त्यांच्या प्रत्येक निर्णयावर आणि प्रत्येक पावलावर संपूर्ण देशाची नजर असते. त्यांचा कार्यकाळ या वर्षी नोव्हेंबरमध्ये संपत आहे. चंद्रचूड सोशल मीडियावर सक्रिय नाही.


5) एस जयशंकर


एस जयशंकर (69) यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. परराष्ट्रमंत्री मोदींचा चाणक्य म्हणून ओळखला जातो. आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात युरोपीय देशांपासून रशियापर्यंत त्यांनी भारताची बाजू उत्कृष्ट पद्धतीने मांडली आहे.


6) योगी आदित्यनाथ 


देशातील सर्वाधिक लोकसभेच्या जागा असलेल्या राज्याचे प्रतिनिधित्व योगी आदित्यनाथ  (51 वर्षे) करतात. 2024 मध्ये भाजप या राज्यात कशी कामगिरी करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गोरखनाथ मठाच्या महंताने आपल्या अध्यात्मिक अधिकारासोबतच सत्तेत असलेल्यांना कडक कारभाराचा संदेश दिला आहे, याची जोरदार चर्चा सुरू आहे. 


7) राजनाथ सिंह 


राजनाथ सिंह ( 72 वर्षे) हे पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सहाय्यकांपैकी एक आहेत. राजकीय अनुभवासोबतच त्यांनी संरक्षण मंत्रालयाची जबाबदारीही उत्कृष्ट पद्धतीने पार पाडली आहे. त्यांची पडद्यामागची भूमिका राजस्थानमध्ये खूप सक्रिय होती. ट्रबलशूटर म्हणूनही राजनाथ यांची ओळख आहे.


8) निर्मला सीतारामन 


अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( 64 वर्षे)  यांचा समावेश पंतप्रधान मोदी यांच्यावर सर्वाधिक विश्वास असलेल्या मंत्र्यांमध्ये होतो. त्या देशाच्या पहिल्या पूर्णवेळ आणि सर्वाधिक काळ अर्थमंत्री पदावर राहणाऱ्या महिला अर्थमंत्री आहेत. महागाई आणि विकासाचा समतोल साधणे हे त्यांचे प्राधान्य आहे.


9) जेपी नड्डा 


जेपी नड्डा (63 वर्ष)  हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीत संघटनेचे नेते म्हणून नड्डा यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवले आहे. पक्षाने त्यांची पुन्हा राज्यसभेवर निवड केली आहे. नड्डा यांचे सोशल मीडियावर 36 लाख फॉलोअर्स आहेत.


10) गौतम अदानी 


गौतम अदानी ( 61 वर्षे) हे एकमेव उद्योगपती आहेत ज्यांचा टॉप-10 यादीत समावेश आहे. अदानी हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत भारतीय आहेत. गेल्या वर्षी हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानीने जोरदार पुनरागमन केले आहे. अदानी समूह बंदरे, ऊर्जा, हरित ऊर्जा आणि विमानतळांमध्ये 7 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. अदानींचे सोशल मीडियावर 10 लाख फॉलोअर्स आहेत.


महत्वाच्या बातम्या:


भारत बनतोय श्रीमंतांचा देश, 2023 मध्ये श्रीमंतांच्या संख्येत झाली 'एवढी' वाढ