Sudhakar Badgujar Viral Video Case : नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्याविरोधात सलीम कुत्तासोबत (Salim Kutta) पार्टी केल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आडगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यावर आता खुद्द बडगुजर यांची प्रतिक्रिया आली आहे. "राजकिय सूडबुद्धीने हा गुन्हा दाखल झाला आहे. तब्बल 8 वर्षांनी गुन्हा दाखल झाला असून, यासाठी पोलिसांवर प्रचंड दबाव आहे. मात्र, इतर पक्षाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा केलाय का?, असे म्हणत सुधाकर बडगुजर यांनी आपली भूमिका मांडली आहे.
याबाबत पत्रकार परिषद घेऊन सुधाकर बडगुजर म्हणाले की, "खासदार हेंमत गोडसे यांचा मध्यंतरी व्हिडीओ व्हायरल झाला, त्या प्रकरणी चौकशी केली नाही. त्यावेळी सीडीआर तपासले असते तर सर्व बाबी समोर आल्या असत्या. मात्र, आठ वर्षानंतर माझ्यावर गैरकृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली आहे. तिथे असणाऱ्या इतर पक्षाच्या लोकांवर देखील गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. मी त्याठिकाणी फक्त तिथे 5 मिनिट होतो. त्यामुळे तिथे असणाऱ्या बाकी लोकांवर देखील कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सुधाकर बडगुजर यांनी केली आहे.
गुन्हा दाखल झाला असल्याने न्यायालयात जाणार...
पुढे बोलतांना सुधाकर बडगुजर म्हणाले की, "खासदारांचे देखील व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यावर काही कारवाई करण्यात आली नाही. विरोधकांना दाबण्याचा हा प्रयत्न निंदनीय आहे. माझ्यावर गुन्हा दाखल झाले असेल तर न्यायालयात जाईल. दुःख हे आहे की 8 वर्षापूर्वीच्या घटनेत गुन्हा दाखल झाला आहे. 6 वर्षानंतर केस बंद करण्याचा निर्णय सरकारचा आहे. मात्र, आम्ही केले ते पाप आणि त्यांनी केले ते पुण्य असे सरकार वागत आहे. उद्धव ठाकरे हे माझ्यासोबत आहेत, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आज चाललो असल्याचं सुधाकर बडगुजर म्हणाले आहेत.
काय आहे प्रकरण...
मुबई बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्ता बरोबर सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा एक तथाकथित व्हिडिओ भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्वीट केला होता. तसेच, हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार नितेश राणे, शिवसेना मंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. याच प्रकरणात नाशिक गुन्हे शाखेच्या वतीने चौकशी करण्यात येत होती. पोलिसांच्या याच तपासात, पार्टीत बडगुजर उपस्थित होते, काही भेटवस्तू दिल्या गेल्या असे पोलीसांच्या चौकशीत झाले निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलाम अंतर्गत बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
सलीम कुत्तासोबतची पार्टी भोवली, नाशिकचे ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजरांवर अखेर गुन्हा दाखल