LIC Share Price News : एलआयसीचा शेअर पेटीएमच्या वाटेवर चाललाय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एलआयसीचा आयपीओबाजारात आल्यानंतर तब्बल एकाच महिन्यात 239 रुपये प्रति शेअर गुंतवणूकदारांना तोटा झाला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसोबतच सरकारही चिंतेत पडलं आहे.


एलआयसीच्या काही समभागांच्या निर्गुंतवणुकीची घोषणा झाली. अनेकांना पैसे कमवण्याची संधी मिळाली असं वाटलं होतं. प्रथमदृष्ट्या शेअर बाजारात आपले नशीब आजमावण्याची नामी संधी आहे असं वाटलं. मात्र, एलआयसीचा आयपीओ बाजारात आल्यानंतर शेअर दराला उतरती कळा लागली आहे. एलआयसीचा शेअर शुक्रवारी 710  रुपये प्रति शेअरवर बंद झाला. अनेक गु्ंतवणुकदारांचे प्रति शेअर 200 रुपयांहून अधिकचे नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे गुंतवणुकदार चिंतेत सापडले आहेत. शेअर दरात सुरू असलेल्या घसरणीचा परिणाम एलआयसीच्या बाजारमूल्यावरही झाला आहे. एलआयसीचे बाजार भांडवल 6 लाख कोटी रुपये होते. त्यात आता घसरण होऊन 4.50 कोटी रुपये इतकंच राहिले आहे. 


एलआयसीची अग्निपरीक्षा सुरू?


एलआयसीच्या शेअरमध्ये सातत्याने होत असलेल्या पडझडीमुळे सरकारही चिंतेत आहे. दुसरीकडे, ॲंकर इन्व्हेस्टर्ससाठी असलेला लॉक-इन कालावधी 13 जून रोजी संपत आहे. अशातच एलआयसीच्या भविष्यासाठी उद्याचा दिवस अधिक महत्त्वाचा असणार असल्याचे म्हटले जात आहे. एलआयसीच्या शेअरमध्ये होत असलेल्या पडझडीमुळे लॉक-इन कालावधी संपताच ॲंकर इन्व्हेस्टर्सकडे आपले शेअर्स विकण्याचा पर्याय असेल. शेअर्सच्या किमती घसरल्याने हे ॲंकर इन्व्हेस्टर्सही मोठ्या तोट्यात आहेत. जर ॲंकर इन्व्हेस्टर्सने त्यांचे शेअर्स विकले तर एलआयसीचे शेअर्स घसरतील. त्यामुळे गुंतवणुकदारांची चिंता वाढलीय. 


एलआयसीचे साडे तीन टक्के समभाग विक्रीसाठी सरकारनं काढले होते. मात्र, गुंतवणुकदारांना हवा तसा फायदा झाला नाही. दुसरीकडे, निर्गुंतवणुकीतून पैसे उभे करण्याचा मोदी सरकारचा मानस आहे. मात्र, युक्रेन-रशिया युद्धामुळे असलेली अस्थिरता आणि कोव्हिड परिस्थितीमुळे यात मोठ्या अडचणी येत आहेत. बीपीसीएल आणि आयडीबीआयसारख्या बॅंकांमधून सरकार पैसा उभा करु पाहतेय. मात्र, सरकारी एलआयसीचे उदाहरण बघता पुढील वाट बिकट असल्याचे दिसते.