LIC Shareholding Adani Group : उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावर अमेरिकेत लाचखोरी आणि फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपानंतर उद्योगविश्व तसेच शेअर बाजारात एकच खळबळ माजली आहे. हे आरोप झाल्यानंतर भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये बुडाले आहेत. अदानी उद्योगसमूहाने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, या आरोपामुळे सामान्य गुंतवणूकदारांच्या पैशांची राखरांगोळी झाली आहे. सोबतच भारत सरकारच्या मालकीच्या एलआयसीचेही जवळपास तब्बल 1200 कोटी रुपये बुडाले आहेत. 


एलआयसीचे जवळपास 11,728 कोटी रुपये बुडाले


गुरुवारी (21 नोव्हेंबर 2024) रोजी अदानी उद्योग समूहावर हा आरोप करण्यात आला आहे. अमेरिकेतील डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आणि यूएस सिक्योरिटीज अँड एक्स्जेंचने हे आरोप केले आहेत. या आरोपांमुळे एलआयसी या सरकारच्या विमा कंपनीचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. सप्टेंबर 2024 च्या शेअरहोल्डिंगनुसार एलआयसीने अदानी उद्योग समूहाच्या सात कंपन्यांत गुंतवणूक केलेली आहे. अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स अदानी ग्रीन एनर्जी, अदानी एनर्जी सोल्यूशन्स, अदानी टोटल गॅस, एसीसी अँड अम्बुजा सिमेंट्स या कंपन्यांत एलआयसीने आपले कोट्यवधी रुपये गुंतवलेले आहेत. या सर्वच कंपन्यांचे शेअर्स गडगडल्यामुळे एलआयसीचे जवळपास 11,728 कोटी रुपये बुडाले आहेत. 


अदानी पोर्ट्सने दिला जोरदार धक्का


एलआयसी कंपनीने सर्वाधिक गुंतवणूक अदानी पोर्ट्स या कंपनीत केलेली आहे. मात्र याच कंपनीने एलआयसीचे सर्वाधिक पैसे बुडवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अदानी पोर्ट्स या एका कंपनीमुळे एलआयसीचे 5009.88 कोटी रुपये बुडाले आहेत. तर अदानी एंटरप्रायझेस या कंपनीमुळे एलआयसीचे 3012.91 कोटी रुपये बुडाले आहेत. अंबुजा सिमेंटच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यामुळे एलआयसीचे 1207.83 कोटी रुपये बुडाले आहेत. 


एसीसी कंपनीतील घसरणीमुळे 381.66 कोटी रुपये बुडाले


एलआयसीचे अडानी टोटल गॅस कंपनीमुळे 807 कोटी, अडानी एनर्जी सोल्यूशन्स कंपनीमुळे 716.45 कोटी रुपये, अदानी ग्रीन एनर्जी कंपनीतील 592.05 कोटी रुपये, तर एसीसी कंपनीतील घसरणीमुळे 381.66 कोटी रुपये बुडाले आहेत. 


अदानी यांच्यावर नेमका आरोप काय? 


अमेरिकेत गौतम अदानी तसेच त्यांचे भाचे सागर अदानी यांच्यावर सोलार एनर्जीचे कंत्राट मिळावे यासाठी 2020 ते 2024 या काळात भारतातील शासकीय अधिकाऱ्या साधारण 25 कोटी डॉलर्सपेक्षा अधिक रक्कम लाच म्हणून दिल्याचा आरोप लावण्यात आला आहे. हे कंत्राट मिळाल्यानंतर अदानी उद्योग समूहाला दोन अब्ज डॉलर्सचा लाभ होणार होता, असा दावा करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार अदानी उद्योग समूहाने अमेरिकेतील बँका आणि गुंतवणूकदारांपासून लपवून ठेवला आहे, असा आरोप अमेरिकेत करण्यात आला आहे. अदानी उद्योग समूहाने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत.


हेही वाचा :


काल पडझड, आज चित्र सकारात्मक, अदानींवरील आरोपांनंतर शेअर बाजाराची नेमकी स्थिती काय? वाचा सविस्तर...


आला रे आला मोठा आयपीओ आला! ग्रे मार्केटमध्येही होतेय चर्चा; पैसे ठेवा तयार