Lek Ladki Yojana 2024:  महाराष्ट्र विधीमंडळाचं (Maharashtra Legislature) अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) सुरू असून आज अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांनी येत्या वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला. यंदाचं वर्ष निवडणूक वर्ष असल्यानं राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget) सादर करण्यात आला. अर्थमंत्री अजित पवारांनी गेल्या वर्षी सरकारनं घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आणि आगामी वर्षासाठी सरकारकडून करण्यात आलेल्या विशेष तरतूदींचा लेखाजोगा सरकारसमोर मांडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023 मध्ये सुरू केलेल्या लेक लाडकी योजनेबाबत (Lek Ladki Scheme) मोठी घोषणा केली. 


मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना (Lek Ladki Yojana) 1 एप्रिल 2023 पासून सुरू करण्यात आली आहे. लाभार्थी मुलीला या योजनेतून तिच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत टप्प्याटप्प्यानं 1 लाख 1 हजार रुपये मिळतील, अशी तरतूद करण्यात आली असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी विधीमंडळात अर्थसंकल्प सादर करताना दिली आहे. लेक लाडकी योजनेनुसार, मुलगी जन्माला आल्यापासून ते मुलगी सज्ञान होईपर्यंत तिला आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेनुसार, राज्यात मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये देण्यात येणार आहेत. तर मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर मुलीला रोख 75 रुपये देण्यात येतील.


'लेक लाडकी योजना' नेमकी काय? (What Is Lek Ladki Yojana?)


महाराष्ट्र सरकारची लेक लाडकी योजना ही प्रामुख्यानं गरिब कुटुंबातील मुलींसाठी आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ही अभिनव योजना सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकार लेक लाडकी योजनेंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत आर्थिक मदत करेल. ही आर्थिक मदत मुलीचं वय 18 वर्ष होईपर्यंत सरकारकडून दिली जाईल. जे वर्ग श्रेणीनुसार वेगवेगळ्या वयोगटात दिले जातील. 


लेक लाडकी योजना विशेषतः मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. याद्वारे गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत देऊन महिला सक्षमीकरणाला चालना मिळू शकते. या योजनेचा लाभ कसा मिळवावा, कोण पात्र असेल, या सर्व माहिती सविस्तर जाणून घेऊयात... 


कोणत्या मुलींना मिळणार योजनेचा लाभ? 


'लेक लाडकी' योजनेचा लाभ राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना मिळणार आहे.  जन्मानंतर मुलीला 5000 रुपये देण्यात येणार आहेत, तर मुलगी पहिलीत गेल्यानंतर 6000 रुपये, सहावीत गेल्यानंतर 7000 रुपये आणि अकरावीत गेल्यानंतर 8000 रुपये देण्यात येतील. मुलगी 18 वर्षाची म्हणजे सज्ञान झाल्यानंतर तिला रोख 75,000 रुपये देण्यात येतील.


लेक लाडकी योजनेंतर्गत मुलींना आर्थिक मदत नेमकी कशी मिळणार? 



  • मुलगी जन्माला आल्यानंतर 5,000 रुपये

  • मुलगी पहिलीत गेल्यावर 6,000 रुपये

  • मुलगी सहावीत गेल्यावर 7,000 रुपये

  • मुलगी अकरावीत गेल्यावर 8,000 रुपये

  • मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये 


अशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकारच्या 'लेक लाडकी योजने'त मुलींना एकूण 1 लाख 1 हजार रुपये एवढा लाभ राज्य सरकारकडून मिळणार आहे.