Amit Shah Visit Maharashtra : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर भाजपच्या दिल्लीतील नेत्यांचे महाराष्ट्र राज्यातील दौरे वाढले आहेत. उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार असतानाच, आता देशाचे गृहमंत्री तथा भाजपचे नेते अमित शाहा (Amit Shah) देखील 5 मार्चला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. अमित शाहांच्या याच दौऱ्यात त्यांचे तीन जिल्ह्यात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरात त्यांची जाहीर सभा देखील आयोजित करण्यात आली आहे. 


भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शाह 5 मार्चला महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहे. ज्यात, अकोला येथे क्लस्टरच्या बैठकीला शाहा हजर राहणार, तसेच जळगावमध्ये युवासंमेलनाला देखील अमित शाहा उपस्थित राहणार आहे. यासोबतच छत्रपती संभाजीनगर शहरात शाहा यांची जाहीर सभा देखील होणार आहे. त्यामुळे अमित शाहा यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून देखील जोरदार तयारी केली जाण्याची शक्यता आहे. 


यापूर्वी दोनदा संभाजीनगरचा दौरा रद्द...


अमित शाहा 5 मार्चच्या दौऱ्यात छत्रपती संभाजीनगर शहरात जाहीर सभा घेणार आहेत. मात्र यापूर्वी देखील दोनदा अमित शाहा यांच्या याच सभेचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, वेगवेगळ्या कारणांनी त्यांचा दौरा रद्द झाल्याने सभा देखील रद्द करण्यात आल्या. सुरवातीला 17 सप्टेंबरला शाहा संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या सभेची तयारी देखील करण्यात आली होती.  मात्र, यादिवशी अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने वेळेचे नियोजन होत नसल्याने त्यांनी हा दौरा रद्द केला होता. पुढे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचा 15 फेब्रुवारीला महाराष्ट्र दौरा ठरला होता. या दिवशी त्यांच्याकडून महाराष्ट्रातील अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील 15 लोकसभा मतदारसंघांतील तयारीचा आढावा घेण्यात येणार होता. मात्र, तो दौरा देखील रद्द झाला होता. आता पुन्हा एकदा 5 मार्चला अमित शाहा यांचा दौरा असणार असल्याचे समोर येत आहे. 


नरेंद्र मोदी उद्या यवतमाळच्या दौऱ्यावर...


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून, यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे दीड लाखांहून अधिक बचत गटांच्या महिलांना संबोधीत करणार आहे. या मेळाव्यासाठी भारी परिसरात या मेळाव्याची जय्यत तयारी केली जात आहे. या मेळाव्याच्या सभास्थळी 45 एकराच्या विस्तीर्ण जागेवरती सभामंडप उभारण्याचे काम सुरू आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


 Amit Shah : अमित शहा यांचा संभाजीनगर दौरा रद्द