Lek Ladki Yojana: राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक मंगळवारी (10 ऑक्टोबर) पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत मुलींसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मार्च 2023 च्या आर्थसंकल्पीय अधिवेशनात लेक लाडकी योजनेची (Lek Ladki Yojana) घोषणा झाली होती, या योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. या योजनेनुसार, मुलगी जन्माला आल्यापासून ते मुलगी सज्ञान होईपर्यंत तिला आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेनुसार, राज्यात मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये देण्यात येणार आहेत. तर मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर मुलीला रोख 75 रुपये देण्यात येतील.


मुलींना मिळणार आर्थिक मदत


या ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना मिळणार आहे.  जन्मानंतर मुलीला 5000 रुपये देण्यात येणार आहेत, तर मुलगी पहिलीत गेल्यानंतर 6000 रुपये, सहावीत गेल्यानंतर 7000 रुपये आणि अकरावीत गेल्यानंतर 8000 रुपये देण्यात येतील. मुलगी 18 वर्षाची म्हणजे सज्ञान झाल्यानंतर तिला रोख 75,000 रुपये देण्यात येतील.


अशी मिळणार मुलींना आर्थिक मदत



  • मुलगी जन्माला आल्यानंतर 5,000 रुपये

  • मुलगी पहिलीत गेल्यावर 6,000 रुपये

  • मुलगी सहावीत गेल्यावर 7,000 रुपये

  • मुलगी अकरावीत गेल्यावर 8,000 रुपये

  • मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये 


अशा रितीने मुलीला एकूण 1 लाख 1 हजार रुपये एवढा लाभ राज्य सरकारकडून मिळणार आहे.


मुलींसाठी आहे या देखील योजना


सुकन्या समृद्धी योजना


सुकन्या समृद्धी योजना ही अल्पबचत योजना आहे. या अंतर्गत जन्मापासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुलीसाठी खातं उघडता येतं. या योजनेत पालक मुलीच्या नावानं खातं उघडू शकतात. यामध्ये किमान 250 रुपयांमध्ये खातं उघडता येतं. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत आर्थिक वर्षात तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. यामध्ये सध्या 8 टक्के व्याज दिलं जातं. तुम्ही 21 वर्षांनंतर संपूर्ण रक्कम काढू शकता.


उडान योजना


उडान योजना (UDAN) ही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) अंतर्गत सुरू केलेली योजना आहे. शालेय शिक्षण आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांमधील अंतर कमी करण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने (MHRD) ही योजना सुरू केली आहे. 10वी मध्ये किमान 70 टक्के आणि विज्ञान आणि गणित विषयात 80 टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थिनी या उडान योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. यासाठी www.cbse.nic.in किंवा www.cbseacademic.in या वेबसाईटवर अर्ज करता येईल.


हेही वाचा:


NAMO Shetkari Yojana : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी, 2 हजाराचा पहिला हप्ता लवकरच जमा होणार