Budget 2024: भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Minister Nirmala Sitharaman) यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. गेल्या काही वर्षांत देशातील करदात्यांची संख्या झपाट्याने वाढल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. 


किरकोळ व्यवसायासाठी प्राप्तिकर सवलतीची मर्यादा 2 कोटींवरून 4 कोटी रुपये


मोदी सरकारनं सत्तेत आल्यानंतर वैयक्तिक आयकर दर कमी केले आहेत. अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, नवीन कर प्रणालीमध्ये 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर नाही. आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये, प्राप्तिकर मर्यादा ही रक्कम  200000 होती.  मोदी सरकार आल्यानंतर किरकोळ व्यवसायासाठी प्राप्तिकर सवलतीची मर्यादा 2 कोटींवरून 4 कोटी रुपये करण्यात आली आहे. मोदी सरकारनं व्यावसायिकांसाठी कर मर्यादा 50 लाख रुपयांवरुन 75 लाख रुपये केली आहे. कॉर्पोरेट कर दर 30 टक्क्यांवरुन 22 टक्के करण्यात आला आहे. नवीन उत्पादक कंपन्यांसाठी हा कर दर 15 टक्के करण्यात आला आहे. गेल्या 5 वर्षात मोदी सरकारचा भर हा कर भरणाऱ्या लोकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यावर राहिला आहे.


लोकांच्या सरासरी वास्तविक उत्पन्नात 50 टक्के वाढ 


अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, लोकांच्या सरासरी वास्तविक उत्पन्नात 50 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. 2013-14 मध्ये आयकर परतावा येण्यासाठी 93 दिवस लागायचे, ते आता 10 दिवसांवर आणण्यात आले आहेत 2014 नंतर आयकर भरणाऱ्यांची संख्या 2.4 पट वाढली आहे आणि प्रत्यक्ष कर संकलन 3 पटीने वाढले आहे. करदात्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी, भारत सरकारनं फेसलेस कर मूल्यांकन सुरु केले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे की, 93 दिवसांऐवजी आता फक्त 10 दिवसांचा इन्कम टॅक्स रिफंड लागतो, त्यामुळं लोकांना लवकर रिफंड मिळू लागला आहे.


महत्वाच्या बातम्या:


'या' योजनेचा नागरिकांना फायदा, वर्षभरात होणार 18,000 रुपयांची बचत