Akasa Airs : दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या मालकीच्या 'अकासा एअर' (Akasa Airs) कंपनीचं पहिलं विमान अखेर आकाशात झेपावलं. विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांनी अकासाच्या पहिल्या विमानाला झेंडा दाखवला. Akasa Air ही देशातील प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि स्टॉक ब्रोकर राकेश झुनझुनवाला यांची विमान कंपनी आहे. शिंदे यांनी मुंबईहून अहमदाबादला निघालेल्या अकासा एअरच्या पहिल्या व्यावसायिक विमानाला हिरवा झेंडा दाखवला. Akasa Air कंपनीला 7 जुलै रोजी नागरी उड्डयन संचालनालय म्हणजेच, डीजीसीएकडून विमान उड्डाणाची परवानगी मिळाली. त्यानंतर बरोबर एक महिन्यानंतर म्हणजेच, 7 ऑगस्टला पहिल्या विमानानं उड्डाण घेतलं. अकासाचं पहिलं विमान मुंबई-अहमदाबादसाठी झेपावलं.


राकेश झुनझुनवाला यांनी मागील वर्षी विमान वाहतूक सेवेत उतरणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर अनेकांचं लक्ष झुनझुनवालांच्या विमान कंपनीच्या वाटचालीवर आहे. राकेश झुनझुनवाला यावेळी बोलताना म्हणाले की, "बाळाच्या जन्मासाठी 9 महिने लागतात आणि आम्हाला 12 महिने लागले. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचं सहकार्य मिळालं नसते तर हे अजिबात शक्य नव्हतं. 



अकासा एअरलाइन्सनं आपल्या विमान कंपनीकडून  72 बोईंग 737 मॅक्स विमानांची ऑर्डर देण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी अकासा एअरच्या पहिल्या विमानाचा फोटो अकासा एअरलाइन्सने शेअर केला होता. त्यासोबत "Can’t keep calm! Say hi to our QP-pie!" असं कॅप्शन दिलं होतं. 


पहिली विमान सेवा कुठे सुरू होणार?


काही दिवसांपूर्वी अकासा एअरकडून पहिली विमान सेवा कुठे सुरु होणार यासंदर्भात माहिती दिली होती. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात अकासा एअरची विमान सेवा मेट्रो शहरातील टिअर-2 आणि टिअर-3 शहरांसाठी असणार आहे. त्याशिवाय ही विमान सेवा देशातील प्रमुख शहरांमध्येदेखील सुरू राहणार आहे. आगामी 12 महिन्यात 18 विमानांचा ताफा तयार करण्याचं नियोजन कंपनीनं आखल्याचंही त्यावेळी सांगण्यात आलं होतं. त्यानंतर दरवर्षी 12 ते 14 विमानं ताफ्यात दाखल होणार असल्याचीही माहिती कंपनीनं दिली होती.