WPI Inflation: देशात दिवसेंदिवस महागाई वाढत असताना सामान्यांना काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.  जून महिन्यात घाऊक महागाईत दरात घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. केंद्र सरकराने मे महिन्यात गहू, साखर निर्यातीवर बंदी घातली होती. तसेच पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्याने जून महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दरमध्ये (WPI based Inflation Rate) घट झाली आहे.


जूनमध्ये घाऊक महागाईचा दर 15.18 टक्क्यांवर आला आहे. तर मे 2022 मध्ये घाऊक महागाई 15.88 टक्क्यांच्या पातळीवर होता. गेल्या वर्षी जून 2021 मध्ये घाऊक किमतीवर आधारित महागाई दर 12.07 टक्क्यांच्या पातळीवर होता. घाऊक महागाई दर 15 महिन्यांपासून सतत वाढताना दिसत आहे. ही आकडेवारी केंद्रीय अर्थमंत्रालयाने जाहीर केली आहे. अर्थमंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, खनिज तेलांच्या किमतीत झालेली वाढ, खाद्यपदार्थांच्या किमतीत झालेली वाढ, महागडे क्रूड पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, मूलभूत धातू आणि रासायनिक उत्पादने यामुळे घाऊक महागाईत वाढ झाली आहे. 


अन्नधान्याच्या किमती वाढल्या 


घाऊक महागाई वाढण्याचे मुख्य कारण महागडे खाद्यपदार्थ असल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे. जूनमध्ये अन्नधान्य महागाई दर वाढून 12.41 टक्के झाला आहे. तर मे महिन्यात अन्नधान्य महागाईचा दर 10.89 टक्के होता. जून महिन्यात भाजीपाला महागाईचा दर मे महिन्यातील 56.36 टक्क्यांवरून 56.75 टक्क्यांवर पोहोचला आहे. जूनमध्ये बटाटे आणि फळांच्या किमती वाढल्या आहेत. या काळात दूधही महाग झाले आहे.


घाऊक महागाईच्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात इंधन आणि विजेच्या घाऊक महागाईचा दर 40.38 टक्के राहिला आहे. मात्र मे महिन्याच्या 40.62 टक्क्यांच्या महागाई दरापेक्षा तो किरकोळ कमी आहे. जून महिन्यात उत्पादन वस्तूंच्या घाऊक महागाईचा दर मे महिन्यातील 101.11 टक्क्यांवरून 9.19 टक्क्यांवर आला आहे. याआधी 12 जून रोजी किरकोळ महागाईची आकडेवारी समोर आली होती. जून महिन्यात किरकोळ चलनवाढीचा दरही किंचित खाली आला असून ती 7.01 टक्क्यांवर आली आहे.