Pune Accident News: पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील दत्त मंदिरासमोरील वाडा आज कोसळला असून शेजारील घरांवर पडून सहा जण अडकले आहेत. स्थानिक नागरिक आणि पुणे अग्निशमन दलाने त्यांची सुटका केली. पुणे अग्निशमन दलाचे फायरमन योगेश पिसाळ यांनी सांगितलं. आम्हाला सकाळी साडेआठच्या सुमारास घटनेची माहिती मिळाली आणि बचावासाठी आम्ही घटनास्थळी पोहोचलो. आम्ही घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी, अडकलेल्या इतर पाच लोकांना रहिवाशांनी वाचवले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर आम्ही सहा जणांची सुटका केली. तर, एकूण 11 जणांना वाचवण्यात यश आले असून ते सुरक्षित आहेत. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही, असंही त्यांनी सांगितलं.
जुने वाडे पडण्याच्या घटना पुण्यात सातत्याने बघायला मिळत आहे. याआधी पुण्यातील नाना पेठेतील मॉर्डन बेकरीसमोर एका दुमजली वाड्यातील घराची भिंत कोसळून दोन जण जखमी झाले होते. अडकलेल्या रहिवाशांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली होती. त्याचबरोबर सोमवार पेठेतील बोळे वाडा येथे पहिल्या मजल्यावरील घराचा काही भाग कोसळला होता. दोन्ही अपघातात कोणतीही सुदैवाने जीवित हानी झाली नाही नव्हती. साधारण साडे-सातच्या सुमारास अग्निशमन दलाच्या कंट्रोलरुम मध्ये जीना कोसळल्याचा फोन आला होता. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान घटना स्थळी पोहचले.
पुण्यतील जुने वाडे जीर्ण झाले आहेत. त्यामुळे हे वाडे धोकादायक झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यापुर्वी हे वाडे सोडा, अशा प्रकारच्या नोटीसा पुणे महानगरपालिकेने नागरिकांना बजावल्या होत्या त्यानंतर पावसाळ्यापूर्वी शहरातील विविध भागातील 38 हून अधिक अतिधोकादायक वाडे पाडण्यात आले आहेत. एक-दोन नाहीतर तब्बल 478 वाडे धोकादायक असल्याचं निदर्शनास आल्यावर पालिकेने त्यांना नोटीसा बजावल्या आहेत. पुणे शहरात अनेक जुने वाडे आहेत. ते वाडे कालांतराने जीर्ण झाले आहेत. जुन्या वाड्यांना शाबूत ठेवण्यासाठी डागडूजी केली जाते. त्यामुळे वाड्यांना फार वेळा धक्का बसतो. त्यामुळे वाडे पुन्हा खिळखिळे होतात. असे वाडे नागरिकांसाठी धोकादायक आहे.