Shark Tank India 2 : आयआयटी बॉम्बेचे पदवीधर वरद पाटील (Varad Patil) यशोगाथा म्हणजे हिंमत, सातत्य, चिकाटी आणि परिश्रमाचे मूर्तीमंत उदाहरण. 2013 साली वरद यांनी वर्ल्डस्किल्स स्पर्धेच्या (WorldSkills Competition) मेकॅनिकल इंजिनीअरिंग एडेड डिझाइन (MCAD) गटामध्ये भाग घेतला. तेव्हापासून आपला प्रवास सुरू करणारे वरद पाटील आज आपल्या सहकाऱ्यांबरोबर शार्क टॅन्कच्या दुसऱ्या सीझनमध्ये (Shark Tank India 2) स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. AyuSynk या त्यांच्या  आयआयटी बॉम्बे स्टार्टअपचं नाव आहे. नुकतंच, एमक्युअर फार्मास्युटिकल्सच्या सीएफओ नमिता थापर यांच्याकडून त्यांना 1.5 कोटींचं फंडिंग मिळालं आहे. 


कोण आहेत वरद पाटील? 


वरद यांना नेहमीच डिझायनिंग आणि नव्या गोष्टी शिकण्याचा उत्साह होता. इंजिनीअरिंग करताना डिझाइनिंगच्या या वेडामुळेच त्यांनी रोबोकॉन 2012 आणि ऑटोडेस्क स्टुडन्ट डिझाइनसारख्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला. यापैकी आयआयटी मद्रास येथे पार पडलेली ऑटोडेस्क स्पर्धा त्यांनी जिंकली. या स्पर्धेमध्ये त्यांनी 1.2 लाखांचे रोख पारितोषिक जिंकले. यातूनच त्यांनी वर्ल्डस्किल्स फाउंडेशनसाठी तयारी सुरू केली. 


वरद यांच्या पालकांनी त्यांना सतत प्रोत्साहन दिले. आपली स्वप्ने साकार करण्याची जबाबदारी आपलीच असते आणि त्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात हा कानमंत्रही त्यांना दिला. सुरुवातीला कोणत्याही तरुणाप्रमाणे वरद यांनाही आपण आयुष्यात नेमके काय करायचे याची निश्चित कल्पना नव्हती. याच काळात त्यांना इंडियास्किल्स स्पर्धेविषयी कळले. ही स्पर्धा जिंकल्यानंतर त्यांना वर्ल्डस्किल्स स्पर्धेच्या निमित्ताने एका जागतिक मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. या स्पर्धेमुळे त्यांच्यासमोर संधींची अनेक दारे खुली झाली आणि आपली क्षमता आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. 


कॉलेज संपल्यानंतर ते एका बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशनमध्ये रुजू झाले, जिथे ते ऑइल आणि गॅस प्लॅटफॉर्म्स आणि फार्मास्युटिकल्सच्या डिझाइनिंग आणि उभारणीच्या कामामध्ये सहभागी झाले. स्पर्धेदरम्यान मिळालेल्या सखोल प्रशिक्षणामुळे त्यांच्याठायी नेतृत्वगुण, समस्या निवारणाची क्षमता आणि सॉफ्ट स्किल्सही विकसित झाले होते, ज्याचा या नोकरीत त्यांना उपयोग झाला. वरद इंडियास्किल्स आणि वर्ल्डस्किल्स स्पर्धेचे पुरस्कर्ते आहेत, कारण युवा, प्रतिभाशाली व्यक्तींना आपल्या कुशलतेला परजण्याची आणि आपल्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणण्याची संधी मिळत नाही या वास्तवाची त्यांना जाण आहे. म्हणूनच ते इंडियास्किल्सच्या स्पर्धकांशी उत्साहाने संपर्क साधतात आणि त्यांना वर्ल्डस्किल्स स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी प्रशिक्षण देतात. 


आयआयटीमध्ये शिकताना त्यांनी देसाई सेठी स्कूल ऑफ एंटरप्रेन्योरशिपमधून अनेक अभ्यासक्रम केले आणि इथेच त्यांची आदर्श आणि तापस यांच्याशी भेट झाली जे तेव्हा डिजिटल स्टेथेस्कोपसाठीच्या आयु डिवाइसेस या स्टार्ट-अपवर काम करत होते. सीईओ बनलेल्या आदर्श यांनी बिझनेस डेव्हलपमेंटची जबाबदारी घेतली आणि तंत्रज्ञानाचा ध्यास असलेल्या तापस यांनी कंपनीच्या हार्डवेअर यंत्रणा हाताळल्या. त्यांच्या टीमला कंपनीचा सॉफ्टवेअर आणि अॅनालिटिक्सचा भाग सांभाळू शकणाऱ्या व्यक्तीची गरज होती, आणि इथेच सॉफ्टवेअर आणि अॅनालिटिक्समधील कामाचा वरद यांचा अनुभव आणि ज्ञान उपयोगी पडले आणि कंपनीच्या टीमला अगदी हवा तसा नवीन सदस्य मिळाला. वरद सध्या आपल्या डिजिटल आणि वैद्यकीय उपकरण उपाययोजना आणि सेवांद्वारे वाजवी दरांत परवडणाऱ्या आरोग्य सुविधा पुरविण्याच्या हेतूने सुरू झालेल्या आयु डिव्हायसेसमध्ये कार्यरत आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या : 


First Investment Plan : आयुष्यातील पहिली गुंतवणूक कशी आणि कुठे कराल? गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय जाणून घ्या