मुंबई: बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच भारतात नोकऱ्यांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. जगभरातल्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्या आता भारतात जवळपास 1.80 ते दोन लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार आहेत. अमेक्स, बँक ऑफ अमेरिका, मॉर्गन स्टॅनले यासारख्या अनेक कंपन्यांनी भारतात कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 


कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेला. लसीकरणानंतर ही परिस्थिती आता बदलली आहे. बहुतांश कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम बंद करुन आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येण्यास सांगितलं आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये या कंपन्यांमध्ये नव्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली नव्हती. आता मात्र या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची भरती करण्याची तयारी सुरू केली आहे. इकॉनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, भारतात फर्म असलेल्या मल्टीनॅशनल कंपन्या अर्थात बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आता भारतात 1.80 लाख ते दोन लाख नव्या कर्मचाऱ्यांची भरती करण्याची तयारी सुरू केली आहे. 


अॅमेक्स, बँक ऑफ अमेरिका, वेल्स फर्गो, सिटी, बारक्लेज, मॉर्गन स्टॅनले, एचएसबीसी, स्टॅन्डर्ड चार्टर्ड, गोल्डमन सॅक, अमेझॉन, टार्गेट, वॉलमार्ट, शेल, जीएसके, अॅबॉट, फायझर, अॅस्ट्राझेनेका या कंपन्यांच्या फर्मकडून भारतात मोठी भरती करण्यात येणार आहे. 


पोस्ट कोरोना काळात जग अधिक डिजिटल होताना दिसतंय. त्यामुळे टेक्नॉलॉजी क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळेच बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या Global Capability Centres (GCCs) कडून यासाठी हालचाली सुरू आहेत. भविष्यात आर्टिफिशिअर इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची गरज असणार आहे. 


भारतात 8000 नोकऱ्या देण्यात येणार असल्याचं अमेझॉनने या आधीच सांगितलं आहे. येत्या 2025 सालापर्यंत भारतात एकूण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे 20 लाख रोजगार देण्याचं अमेझॉनचे ध्येय असल्याचंही कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :