Pankaja Munde on Dhananjay Munde :  शरद पवार यांच्याकडे राजकीय लेन्सेस आहेत आणि आमचे बंधू त्यांच्या लेन्सेसमधून बघत आहेत असा चिमटा पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात काढला. त्याला पंकजा मुंडे लेन्सेस बदलून महाविकास आघाडीच्या लेन्सेस लावतील का? असं म्हणत धनंजय मुंडे यांनीही त्यांना टोला लगावला. डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळा आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह दिग्गज राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत पार पडला. पण या सोहळ्यात लक्ष वेधून घेतलं ते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीनं. यावेळी पंकजा आणि धनंजय मुंडे यांनी एकमेकांवर शाब्दीक कोटी करण्याची संधी सोडली नाही. 


काय म्हणाल्या पंकजा मुंडे?


ज्यांच्या अनुभवाच्या राजकीय दृष्टीच्या लेन्सेस आज कोणाकडेही नसतील असे शरद पवार, असा पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांचा उल्लेख केला. सगळ्यांशी मवाळ आणि चांगलं वागणारे, ज्यांच्या लेन्सेस सगळ्यांना सूट करतील असे बाळासाहेब थोरात. नवीन दृष्टी देण्याची अपेक्षा असणारे, ज्यांच्या लेन्सेसकडे युवक आज बघत आहेत असे आदित्य ठाकरे, असा त्यांचा पंकजा मुंडेंनी उल्लेख केला. त्याचबरोबर 'मुंडे-महाजनांच्या लेन्सेसमधून स्वत: ला मोठ करत करत आज पवारसाहेबांच्या लेन्सेसमधून बघण्याचं भाग्य खूप कमी लोकांना लाभले त्यातील एक आमचे बंधू धनंजय मुंडे' असा पंकजा मुंडेंनी त्यांचा उल्लेख केला. तसेच मला आणखी चष्मा लागला नाही, पण माझ्या भावाला चष्मा लागला असल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी पंकजा मुंडेंनी रघुनाथ मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात लढवलेल्या निवडणुकीची आठवण सांगितली. राजकारणाच्या पलिकडे जाऊन एक प्रेम होते अशा पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. मृत्यूला सामोरं जाणारे तात्यासाहेब लहाने यांनी आपला सेवेचा धर्म पूर्ण केल्याचे ते म्हणाले.


काय म्हणाले धनंजय मुंडे?
 
1978 ला विधानसभेची निवडणूक झाली. ही निवडणूक रघुनाथरावजी मुंडे विरुद्ध गोपीनाथराव मुंडे अशी झाली. या निवडणुकीत मुंडे साहेबांचा पराभव झाला. त्याच वर्षी जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. ती जिल्हा परिषदेची निवडणूक गोपीनाथ मुंडे यांनी जिंकल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. रघुनाथराव मुंडे यांच्यासारखा मोठ्या दृष्टीचा दुसरा नेता नव्हता असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांनाही टोला लगावला. कदाचित पंकजा ताईंनी लेन्सेस बदलल्या आणि महाविकास आघाडीच्या लावल्या तर, असे मला आदित्य ठाकरे म्हणाल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. बहिण भावाचे राजकीय वैर जगाला माहित आहे. पण काही व्यक्तिंसाठी आमचं वैर काही नाही. ती व्यक्ती आमच्यासाठी महत्वाची असल्याचे मुंडे यावेळी म्हणाले. आमच्यासाठी तुम्ही मोठे असल्याचे धनंजय मुंडे तात्याराव लहाने यांना उद्देशून म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या: