IRCTC Share Price : भारतीय रेल्वेच्या मालकीची कंपनी असलेल्या आयआरसीटीसी म्हणजेच इंडियन रेल्वे केटरिंग आणि टूरिझम कॉर्पोशनने (Indian Railway Catering and Tourism Corporation - IRCTC) एक नवा विक्रम केला आहे. या कंपनीचं शेअर बाजारातील भांडवली बाजार मूल्य (market capitalization) एक ट्रिलियन पर्यंत म्हणजे सोप्या मराठीत एक लाख कोटींपर्यंत पोहोचलं आहे. आज सकाळच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरसीटीसीच्या शेअरने 6332.25 हा सर्वाधिक किंमत मिळवली. या शेअरमध्ये आज तब्बल आठ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली तर गेल्या फक्त पाच दिवसांच्या व्यवहारात या शेअरमध्ये 33 टक्क्यांची वाढ झाली आहे. आयआरसीटीसीच्या शेअरमधील तेजीमुळे या कंपनीचं बाजार मूल्य हे तब्बल 1,00,612 कोटींपर्यंत पोहोचलं. 


एकूणच आज आयआरसीटीच्या कामगिरीमुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांकही ही वधारला आहे. सकाळी साडेनऊच्या सुमारास बीएसईचा सेन्सेक्स 62131 वर पोहोचला होता. मिड कॅप कंपन्याच्या रँकिंगमध्ये आयआरसीटीसी ही कंपनी 57 व्या स्थानावर आहे. आयआरसीटीच्या शेअर मार्केटमधील परफॉर्मन्समुळे कंपनीने इंडसइंड बँक आणि आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाईफ इन्शुरन्स कंपनीला मागे टाकलंय. 


आयआरसीटीसी ही भारतीय रेल्वेच्या वेगवेगळ्या सेवांमध्ये केटरिंग म्हणजे अन्नधान्य सेवा पुरवणारी एकमात्र अधिकृत कंपनी आहे. त्याशिवाय रेल्वेच्या ऑनलाईन तिकीटांची विक्रीही आयआरसीटीसीमार्फतच होते. रेल्वेच्या देशभरातील रेल्वेगाड्या, स्टेशन्स, त्यातील प्लॅटफॉर्म्स यामधील खानपान सेवेची स्टॉल्स आणि पाणी विक्री आयआरसीटीसीमार्फतच होते. 


आयआरसीटीसीने 30 जुलै रोजी स्टॉक स्प्लिट करण्याचा निर्णय जाहीर केला. तेव्हापासून कंपनीच्या शेअरमध्ये 172 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आलीय. 12 ऑगस्ट रोजी एका शेअरची पाच समान शेअरमध्ये विभागणी करण्याला आयआरसीटीसीच्या बोर्डाने मंजूरी दिली. स्टॉक स्प्लिटच्या अंमलबजावणीसाठी 28 ऑक्टोबर 2021 हील तारीख निश्चित करण्यात आली आहे. गेल्या वर्षभराचा म्हणजे 52 आठवड्यातील कामगिरीचा विचार केला तर आयआरसीटीसीच्या शेअर्सने 364 टक्क्यांचा परतावा दिला आहे. 


साधारणपणे सामान्य आणि लहान गुंतवणूकदारांना शेअरमध्ये गुंतवणूक करणं सुलभ व्हावं यासाठी स्टॉक स्प्लिट केलं जातं. यामुळे कंपनीच्या भांडवली बाजार मूल्यात बदल होत नाही, मात्र शेअरची विभागणी केल्यामुळे शेअर्सची संख्या वाढते आणि सामान्य गुंतवणूकदारांसाठी शेअर खरेदीच्या आवाक्यात येतो.