LIC Income in December: जीवन विमा कंपन्यांच्या डिसेंबर 2021 मधील नवीन पॉलिसी प्रीमियममध्ये फारसी वाढ झाली नसल्याचे चित्र आहे. मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास तेवढेच प्रीमियम उत्पन्न राहिले. विमा कंपन्यांनी 24,466.46 विमा उत्पन्न मिळवले. विमा नियामक प्राधिकरण IRDA ने डिसेंबरमधील आकडेवारी जाहीर केली. डिसेंबर महिन्यात 24 जीवन विमा कंपन्यांच्या प्रीमियम एकत्रित रक्कम डिसेंबर 2020 इतकीच असल्याचे त्यांनी सांगितले. डिसेंबर 2020 मध्ये 24,383.42  कोटी रुपयांचा प्रीमियम जमा झाला होता. 


मार्च महिन्यात LIC चा आयपीओ


IRDAI नुसार, डिसेंबर महिन्यात सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी  एलआयसीचा नवीन प्रीमियममधील वाटा घसरला आहे. एलआयसीने 11,434.13 कोटी रुपये प्रीमियमद्वार जमवले. एलआयसीच्या प्रीमियममध्ये जवळपास 20.30 टक्के घट झाली. एलआयसी मार्च महिन्यात आयपीओ खुला करणार आहे. 


23 कंपन्यांच्या उत्पन्नात वाढ 


इतर 23 जीवन विमा कंपन्यांच्या नवीन पॉलिसीद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नात डिसेंबर 2021 मध्ये 29.83 टक्क्यांनी वाढ झाली. या कंपन्यांना 13,032.33 कोटी इतकी रक्कम प्रीमियमद्वारे मिळाली. एक वर्षापूर्वी हा आकडा 10,037.72 कोटी रुपये इतका होता. 


खासगी कंपन्यांच्या उत्पन्नात वाढ


खासगी कंपन्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. एचडीएफसी स्टँडर्ड लाइफच्या नवीन प्रीमियम उत्पन्नात 55.67 टक्क्यांनी वाढ होऊन 2,973.74 कोटी रुपयांवर पोहचली. एसबीआय लाइफच्या नवीन प्रीमियमद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नात 26.72 टक्क्यांनी वाढ होऊन 2,943.09 कोटी रुपये इतके झाले. तर, आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफच्या नवीन प्रीमियमद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नात डिसेंबर 2020 च्या तुलनेत 6.02 टक्के घट झाली. ही रक्कम 1,380.93  कोटी रुपयांवर आली. त्याच प्रमाणे कोटक महिंद्रा लाइफ, ऐगॉन लाइफ, फ्यूचर जनरल या कंपन्यांच्या प्रीमियम उत्पन्नात घट झाली आहे. 


प्रीमियममध्ये वाढ


एप्रिल-डिसेंबर 2021 मध्ये सर्व आयुर्विमा कंपन्यांचा पहिल्या वर्षाचा प्रीमियम 7.43 टक्क्यांनी वाढून 2,05,231.86 कोटी रुपये झाला आहे. या कालावधीत, एलआयसीचे नवीन प्रीमियम उत्पन्न 3.07 टक्क्यांनी घसरून 1,26,015.01 कोटी रुपये झाले.