मुंबई: एलआयसी आयपीओ खरेदी करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. या आयपीओला गुंतवणूकदारांची चांगलीच पसंती मिळाली असून त्याचे 2.95 पटीने सबस्क्रिप्शन करण्यात आलं. हा आयपीओ यशस्वी झाला असून यातून आत्मनिर्भर भारताची ताकद दिसून आली आहे असं प्रतिपादन डिपार्टमेन्ट ऑफ इन्व्हेस्टमेन्ट अॅन्ड पब्लिक असेट मॅनेजमेन्टचे (DIPAM) सचिव तुहीन कांत पांडे यांनी म्हटलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
दिपमचे सचिव तुहीन कांत पांडे म्हणाले की, "एलआयसी आयपीओच्या या यशानंतर आता याच्या लिस्टिंगबद्दल आम्ही आशावादी आहोत, आम्हाला एक प्रकारचा आत्मविश्वास मिळाला आहे."
या आयपीओमध्ये परकीय गुंतवणूकदारांनी तुलनेने कमी गुंतवणूक केली आहे का असं विचारल्यानंतर तुहीन कांत पांडे म्हणाले की, "हा आयपीओ आत्मनिर्भर भारताची ताकद दिसून आली आहे. आपल्या देशातील गुंतवणूकदारांमध्येही गुंतवणूक करण्याची क्षमता आहे हे यातून अधोरेखित झालं आहे. परकिय गुंतवणुकीचे स्वागत आहेच, पण आपण केवळ त्यावर अवलंबून राहू शकत नाही. त्यासाठी देशातील गुंतवणूकदारांना तयार केलं पाहिजे."
एलआयसी आयपीओसाठी बोली लावण्याची मुदत ही 4 मे ते 9 मेपर्यंत होती. एलआयसी कंपनी शेअर बाजारात 17 मेपर्यंत लिस्ट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर यामध्ये ट्रेडिंग सुरू होईल. एलआयसीच्या आयपीओत प्रति शेअर 902 रुपये ते 949 रुपये प्रति शेअर इतकी किंमत ठरवण्यात आली होती. आयपीओच्या एका लॉटमध्ये 15 शेअर आहेत.
एलआयसीकडे 40 लाख कोटींची मालमत्ता असून 30 लाख कोटींचा राखीव निधी आहे. एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. केंद्र सरकार याआधी एलआयसीमधील पाच टक्के हिस्सा विकणार होता. मात्र, बाजारातील अस्थिर परिस्थिती पाहता 3.5 टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. एलआयसीचा आयपीओ गेल्या वर्षीच येणार होता. मात्र, रशिया-युक्रेन युद्धामुळे आणि बाजारातील अस्थिरतेमुळे आयपीओ उशिराने आला.