LIC IPO GMP : शेअर बाजारात सुरू असलेल्या पडझडीचा आणि अस्थिर वातावरणाचा परिणाम एलआयसीच्या आयपीओवर होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ग्रे मार्केट मध्ये शेअर बाजारातील घसरणीचे परिणाम दिसून येत असून एलआयसीच्या शेअर प्रीमियम दरात घट झाली आहे. 


देशातील सर्वात मोठा आयपीओ हा एलआयसीचा आयपीओ ठरला आहे. विमा क्षेत्रातील सर्वात मोठी आणि दिग्गज कंपनी असलेल्या एलआयसीच्या आयपीओ बद्दल चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. एलआयसी आयपीओला किरकोळ गुंतवणुकदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्याशिवाय, पॉलिसीधारकांसाठी असलेल्या राखीव कोट्यातही चांगला प्रतिसाद मिळत आहे.


ग्रे मार्केटमध्ये किती दर?


शेअर बाजारात येऊ घातलेल्या आयपीओला ग्रे मार्केट कसा प्रतिसाद देतो, याकडे अनेकांचे लक्ष असते. ग्रे मार्केटमध्ये एलआयसी शेअर प्रीमियम दर हा 50 टक्क्यांनी घटला आहे. दोन दिवसांपूर्वी एलआयसीच्या प्रीमियम शेअर दर हा 85 रुपयांवर होता. हाच दर आता 42 रुपयांच्या प्रीमियम दरावर ट्रेंड होत आहे. याचाच अर्थ एलआयसीचा शेअर 949 रुपयांवर लिस्ट झाल्यास त्यावर 42 रुपये अधिक प्रीमियम मिळणार. 


शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?


एलआयसीचा आयपीओ आज खुला होणार आहे. गुंतवणूकदारांना 9 मे पर्यंत बोली लावता येणार आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस कंपनी आयपीओसाठी आलेल्या बोलींची पडताळणी करतील. त्यानंतर शुक्रवारी 13 मे रोजी एलआयसी शेअर अलॉटमेंट करण्याची शक्यता आहे. शनिवारी आणि रविवारी शेअर अलॉटमेंट होणार नाही.


अँकर गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद


अँकर गुंतवणूकदारांसाठी सोमवारी 2 मे रोजी आयपीओ खुला झाला होता. अँकर गुंतवणूकदारांना 5627 कोटींची गुंतवणूक केली आहे. एलआयसीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार. अँकर गुंतवणूकदारांकडून 949 रुपये प्रति शेअर या दराने बोली लावण्यात आली. अँकर गुंतवणूकदारांसाठी 5,92,96,853 इक्विटी शेअर राखीव होते. 


(Disclaimer:  ही बातमी केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना आर्थिक सल्लागार, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. गुंतवणुकीसाठी आम्ही सल्ला देत नसून तुमच्या आर्थिक नुकसानीसाठी ABPLive.Com जबाबदार राहणार नाही)