Fixed Deposit Interest Rates :  2023 वर्ष संपण्यापूर्वीच देशातील पाच बँकांनी आपल्या ग्राहकांना नवीन वर्षाची भेट दिली आहे.  स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ते कोटक महिंद्रा बँकेने ग्राहकांना नव्या वर्षाच्या पूर्वी गिफ्ट दिले. आता बँक ऑफ बडोदानेही ग्राहकांना न्यू ईयर गिफ्ट दिले आहेत. पाच बँकांनी त्यांच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात (FD Interest Rate Hike) वाढ केली आहे.


बँक ऑफ बडोदा (BoB)


अलीकडेच बँक ऑफ बडोदाने त्यांच्या व्याजदरात वाढ जाहीर केली आहे. BoB ने वेगवेगळ्या मुदतीच्या मुदत ठेवींवरील व्याजदर 10 बेसिस पॉइंट्सने 125 बेसिस पॉइंट्स किंवा 0.10 टक्के ते 1.25 टक्के वाढवले ​​आहेत. ही व्याज वाढ 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या मुदत ठेवींसाठी करण्यात आली आहे. नवे व्याजदर 29 डिसेंबर 2023 पासून लागू होतील.


स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)


स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरातही वाढ केली आहे. या अंतर्गत 7-45 दिवसांच्या FD वर 0.50 टक्के वाढ झाली आहे. त्याचबरोबर 46-179 दिवसांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात 0.25 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. 180-210 दिवसांच्या FD वर व्याजदर देखील 0.50 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकेतील बदलांनंतर नवीन दर 27 डिसेंबर 2023 पासून लागू झाले आहेत.


कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank)


एफडीवरील व्याजदर वाढवणाऱ्या बँकांच्या यादीत कोटक महिंद्रा बँकेचेही नाव आहे.  तीन ते पाच वर्षांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. आता बँकेत मुदत ठेवी करणाऱ्या ग्राहकांना सामान्य ग्राहकांसाठी 2.75 टक्के ते 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.35 टक्के ते 7.80 टक्के अशा वेगवेगळ्या कालावधीसाठी व्याज दिले जात आहे.


डीसीबी बँक (DCB Bank)


DCB बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर वेगवेगळ्या कालावधीसाठी त्यांचे व्याजदर देखील बदलले आहेत. या बदलानंतर 13 डिसेंबरपासून नवे व्याजदर लागू करण्यात आले आहेत. सात दिवसांपासून ते 10 वर्षांच्या मुदतीच्या एफडीवर आता 3.75 टक्के ते 8 टक्के व्याज दिले जात आहे. या कालावधीसाठी, बँक ज्येष्ठ नागरिकांना 4.25 टक्के ते 8.60 टक्के व्याज देत आहे.


फेडरल बँक


फेडरल बँकेने 500 दिवसांसाठी मुदत ठेवी करणाऱ्या ग्राहकांसाठी व्याजदर वाढवले ​​आहेत. बँकेने 5 डिसेंबर 2023 पासून नवीन दर लागू केले आहेत. या अंतर्गत आता कमाल 7.50 टक्के व्याजदर दिला जात आहे. त्याच वेळी, बँक या कालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना ८.१५ टक्के व्याज देत आहे. तर 21 महिने ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर सर्वसामान्य ग्राहकांना 7.30 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.80 टक्के व्याज मिळत आहे.