International Monetary Fund Report: भारत (India) जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था (India Fastest Growing Economy) आहे आणि अनेक जागतिक संस्थांनी तिचं कौतुक केलं आहे. आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं (IMF) भारताचं भरभरून कौतूक केलं आहे. IMF नं भारताचं वर्णन जगातील 'स्टार परफॉर्मर' म्हणून केलं आहे आणि म्हटलं आहे की, जागतिक वाढीमध्ये (Global Growth) भारताचं मोठं योगदान आहे. डिजिटलायझेशन आणि पायाभूत सुविधांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात आर्थिक सुधारणांमुळे भारताचा विकास दर मजबूत असल्याचं आंतरराष्ट्रीय संस्थेनं म्हटलं आहे. 


जागतिक अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका


भारताचं जगातील स्टार परफॉर्मर म्हणून वर्णन करताना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे की, भारत यावर्षी जागतिक विकासामध्ये 16 टक्क्यांहून अधिक योगदान देत आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, IMF मधील भारताच्या मिशनबाबत नाडा चौईरी (Nada Choueiri)  म्हणाले की, "आम्ही काही काळापासून पाहत आहोत की, भारत खूप मजबूत दरासह विकास करत आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या सोबतच्या देशांकडे पाहता, तेव्हा वास्तविक वाढीच्या बाबतीत ते स्टार परफॉर्मर्सपैकी एक आहे. हे सर्वात वेगानं वाढणाऱ्या मोठ्या उदयोन्मुख बाजारपेठांपैकी एक आहे.


अहवालात भारतातील तरुण लोकसंख्येचा उल्लेख 


IMF नं सोमवारी भारतासोबत वार्षिक लेख-IV सल्लामसलत जारी केली, त्यानुसार भारत यावर्षी जगातील सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. नादा चौरी म्हणाल्या की, भारताची लोकसंख्या खूप मोठी, तरुण आणि वाढती आहे. जर ही क्षमता संरचनात्मक सुधारणांद्वारे वापरली गेली, तर ती मजबूतीनं वाढण्याची क्षमता आहे. चौरी यांच्या मते, भारत सरकारनं (Indian Govt) अनेक संरचनात्मक सुधारणा हाती घेतल्या आहेत, त्यातील प्रमुख सुधारणा म्हणजे डिजिटलायझेशन, जी अनेक वर्षांपासून विकसित होत आहे आणि भविष्यात उत्पादकता आणि वाढीसाठी भारताला मजबूत व्यासपीठावर आणले आहे.


भारतानं कोरोनाला हरवलं 


आयएमएफच्या अहवालात म्हटलं आहे की, भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy) जागतिक विकासाचा एक महत्त्वाचा चालक बनण्यासाठी कोरोना महामारीतून मजबूतपणे उदयास आली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये वाढीनंतर, हेडलाईन महागाई (Inflation) सरासरीनं कमी झाली आहे, जरी ती अस्थिर राहिली आहे. त्यात म्हटलं आहे की, रोजगारानं महामारीपूर्वीची पातळी ओलांडली आहे आणि अनौपचारिक क्षेत्र प्रबळ आहे, तर औपचारिकीकरणात प्रगती झाली आहे. 


सरकारकडून उचलली महत्त्वाची पावलं 


एका प्रश्नाच्या उत्तरात नाडा चौरी म्हणाले की, गुंतवणूक आणि विकासासाठी राजकीय स्थैर्य महत्त्वाचं आहे. व्यवसायांना चालना देण्यासाठी सरकारनं अनेक महत्त्वाची पावलं उचलली आहेत. हा ग्लास अद्याप अर्धा भरलेला आहे, अजूनही काही महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत, ज्यांना आणखी सोपं करणं आवश्यक आहे. परंतु, कंपन्यांसाठी सिंगल नॅशनल विंडो, वन-स्टॉप शॉप यांसारखी अनेक महत्त्वाची पावलं उचलण्यात आली आहेत. आयएमएफनं सल्ला दिला आहे की, देशातील अनेक राज्यांमध्ये नोकरशाही भरपूर आहे, ज्यांना सामोरं जाणं आणि सुव्यवस्थित करणं आवश्यक आहे.