Insurance Regulatory and Development Authority : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) च्या 2019 च्या आकडेवारीनुसार भारतात विमा योजना घेणाऱ्यांचे प्रमाण जगातील सर्वाधिक कमी देशांपैकी एक म्हणजेच 3.69 % इतके कमी आहे. परंतु 2014 पासून ते हे प्रमाण हळूहळू वाढत आहे. इंडियन ब्रँड इक्विटी फाउंडेशनच्या अहवालानुसार ही संख्या 2023 पूर्वी 5.3% च्या चक्रवाढ वार्षिक वाढ दराने (CAGR) वाढेल असे सांगितले आहे. 


या संदर्भात, लिझी चॅपमन, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक, झेस्ट मनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लोक सामान्यतः विम्याला सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची बाब मानत असले तरी, अलिकडच्या काळाने विमा योजनेशिवाय आपली किती अवघड परिस्थिती होऊ शकते हे दाखवून दिले आहे. बाजारात विविध विमा योजना असताना योग्य योजना निवडणे अवघड होऊ शकते. तुमच्या पर्यायांचे मूल्यमापन सुरू करताना टर्म इन्श्युरन्स हा एक चांगला पर्याय आहे.


टर्म इन्शुरन्स म्हणजे काय ? 


टर्म इन्शुरन्स हा विशिष्ट कालावधीसाठी संरक्षणाची हमी देतो. या पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या वेळेत जर विमाधारकाचे निधन झाले तर Death Benefit दिला जातो. समजा असे झाले नाही तर, टर्म इन्शुरन्स विम्याची मुदत संपल्यावर त्याचे नूतनीकरण केले जाऊ शकते. पॉलिसीचे नूतनीकरण करताना प्रीमियमची रक्कम पॉलिसीचे मूल्य (पेआउट रक्कम) आणि विमाधारकाचे वय, आरोग्य, लिंग, पूर्व-अस्तित्वातील वैद्यकीय परिस्थिती आणि सर्वसाधारणपणे वैद्यकीय इतिहास यासारख्या घटकांच्या आधारे पुन्हा मोजली जाते. या तपशीलांची पडताळणी करण्यासाठी सामान्यतः वैद्यकीय तपासणी केली जाते आणि विमा कंपनीला विमाधारकाचा व्यवसाय, धूम्रपानाच्या सवयी, कौटुंबिक इतिहास इत्यादी माहिती असणे आवश्यक असते.


भारतात ही योजना 18 ते 65 वयोगटातील लोकांसाठी आहे. विमा योजनेची मुदत 5-50 वर्ष असू शकते. तसेच सम अॅश्युअर्ड रक्कम 20 लाख रुपयांपासून 1 कोटी किंवा त्याहून अधिक असू शकते. 


टर्म इन्शुरन्सचे फायदे : 



  • कर लाभ - कलम 80 सी आणि कलम 80 डी अंतर्गत भरलेल्या टर्म इन्शुरन्स प्रीमियमवरील कर लाभांचा दावा केला जाऊ शकतो. एकरकमी पेआउट, जी पॉलिसीनुसार विमा रक्कम आहे, आयकर कायद्याच्या कलम 10 (10 डी) च्या अन्वये राहून कर-सवलत आहे.

  • परवडणारे प्रीमियम - या योजनेसाठी प्रीमिअम अधिक परवडणारे आहेत. याचाच अर्थ तुमचा परतावा भरलेल्या प्रीमियमच्या तुलनेत जास्त आहे.

  • अधिक संरक्षण - पारंपारिक जीवन विमा योजना तुमच्याकडून कव्हरेज रकमेच्या 7 -10 % प्रीमियम म्हणून आकारतात. जर वार्षिक प्रीमियम 10,000 रु. असेल तर त्या योजनेचे कव्हरेज म्हणजेच विमा संरक्षण फक्त रु. 1 लाख. असते. या तुलनेने टर्म इन्शुरन्स सर्वसाधारणपणे 10-20,000 मधील प्रीमियम वर मोठा दिलासा देत 1 कोटी रुपयांपर्यंतचे कव्हरेज म्हणजेच विमा संरक्षण देतात. 

  • गंभीर आजारांवर संरक्षण - जर गंभीर आजाराचा टर्म इन्शुरन्स योजनेत समावेश केला असेल तर याचे निदान झाल्यावर एकरकमी पेआउट मिळते. 


सर्वसाधारणपणे ही योजना ऑनलाइन स्वरूपाची असते. सेच यामध्ये तुम्हाला पेमेंटची लवचिकतासुद्धा मिळू शकतो. जसे की, वार्षिक, अर्धवार्षिक, त्रैमासिक, मासिक किंवा साप्ताहिक याची निवड तुम्ही करू शकता. 


स्टॅगर्ड क्लेम पेआउट हे टर्म इन्शुरन्सचे आणखी एक आकर्षक वैशिष्ट्य आहे. या पर्यायानुसार, विमाधारक विम्याची रक्कम कशी मिळेल म्हणजेच एकरकमी, मासिक किंवा वार्षिक हे ठरवू शकतो. 


टर्म प्लॅनसाठी विविध योजना 


1. जितक्या लवकर टर्म इन्शुरन्स घ्याल तितक्या कमी निरोगी वयात तुम्हांला कमी प्रीमियम भरावा लागेल. 
2. एकरकमी पेमेंटपेक्षा नियमित प्रीमियम पेमेंट असलेली योजना खरेदी करा. ते आर्थिक नियोजनासाठी उत्तम राहील.
3. तुमच्या पॉलिसीची कागदपत्रे तसेच मेडिकल सर्टिफिकेट नीट तपासा. त्यामुळे सर्व अटी आणि तपशील योग्यरित्या नमूद केले जातील. हे नंतर बदलणे खूप कठीण आहे.
4. अधिकाधिक दोन पॉलिसी घ्या पण त्याहून जास्त नको. यामुळे तुमच्या आर्थिक जबाबदाऱ्यांवर अडथळा येऊ शकतो.   
5. योग्य विमा कंपनी निवडणे तुम्हाला तुमच्या योजनेचा अधिकाधिक फायदा घेण्यास मदत करते. त्यामुळे विश्वास ठेवण्याजोगी कंपनी निवडा. 


6. तुमच्या कुटुंबाला दीर्घ कालावधीसाठी मदत करू शकणार्‍या मोठ्या रकमेसाठी विमा उतरवणे योग्य ठरेल. 
7. तुमच्या टर्म प्लॅनबद्दल सर्व माहिती सर्वप्रथम तुमच्या कुटुंबाला द्या.    
8. तुमचे आरोग्य आणि वैद्यकीय परिस्थितींबद्दल तुमच्या विमा कंपनीशी पारदर्शकता ठेवणे महत्त्वाचे आहे. विमाकर्ता तुमच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल जितका स्पष्ट असेल तितका तुमचा आणि त्यांच्यामधला विश्वास अधिक चांगला राहतो.


महत्वाच्या बातम्या :