Modi Government Schemes : केंद्र सरकार देशातील जनतेला आर्थिक पाठबळ देण्यासाठी विविध योजना (Yojana) राबवत आहे. या योजनांचा करोडो लोकांना मोठा फायदा होत आहे. आज आपण मोदी सरकारच्या (Modi Govt) सर्वात लोकप्रिय असलेल्या 10 योजनांबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. या योजनांचा नेमका किती फायदा होत आहे. याचा लाभ कसा घ्यावा याबाबतची माहिती पाहुयात.  


पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 


पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही अत्यंत लोकप्रिय झालेली योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबल देण्याचा प्रयत्न केला जातोय. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 रुपयांची आर्थिक मदत करते. प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये हे पैसे थेट शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातात. या योजनेत जमीन, उत्पन्नाचे स्रोत आणि इतर काही बाबी लक्षात घेऊन लाभार्थ्यांची पात्रता ठरवली जाते. आत्तापर्यंत या योजनेचे 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. 


प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना


मोदी सरकारने मार्च 2020 मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन दरम्यान ही योजना सुरू करण्यात आली. 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्यात आले. केंद्र सरकारने या योजनेला अनेकवेळा मुदतवाढ दिली आहे. सध्या या योजनेचा लाभ डिसेंबर 2023 पर्यंत मिळू शकतो. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून देशातील 80 कोटी नागरिकांना दरमहा 5 किलो गहू किंवा तांदूळ मोफत दिला जातो.


उज्ज्वला योजना


देशातील महिलांचे जीवन बदलण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने मे 2016 मध्ये उज्ज्वला योजना सुरू केली. या योजनेंतर्गत बीपीएल कार्डधारकांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते. तसेच वर्षभरात 12 गॅस सिलेंडरवर अनुदान दिले जाते. अनुदान थेट पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. 1 मार्च 2023 पर्यंत उज्ज्वला योजनेचे 9.59 कोटी लाभार्थी आहेत. केंद्र सरकारनं त्याच्या विस्तारासाठी एक योजना देखील जाहीर केली आहे. ज्या अंतर्गत 2023-24 ते 2025-26 या तीन वर्षांत 1650 कोटी रुपये खर्चून 75 लाख नवीन उज्ज्वला एलपीजी कनेक्शन जारी केले जातील.


PM विश्वकर्मा योजना 


PM विश्वकर्मा योजनेंतर्गत 13000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जी पुढील 5 वर्षांसाठी म्हणजे 2023-2024 ते 2027-2028 पर्यंत लागू असणार आहे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत पारंपारिक कारागीर आणि हस्तकलाकारांना विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र मिळणार आहे. तसेच पहिल्या टप्प्यात 1 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज 5 टक्के सवलतीच्या व्याजदराने उपलब्ध होईल. यासाठी कोणत्याही हमीभावाची गरज भासणार नाही.


प्रधानमंत्री आवास योजना 


या योजनेअंतर्गत देशातील गरीब आणि बेघर लोकांना त्यांचे घर बांधण्यासाठी केंद्र सरकारकडून मदत दिली जाते. या रकमेच्या मदतीने दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना स्वत:चे घर बांधता येणार आहे. पीएम आवास योजनेचे दोन प्रकार आहेत, पहिले पीएम आवास ग्रामीण आणि दुसरे पीएम आवास अर्बन जे शहरी भागांसाठी आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सरकार ग्रामीण भागातील लोकांना 1,30,000 रुपये आणि शहरी भागातील लोकांना घरे बांधण्यासाठी 1,20,000 रुपये देते. बहुतेक राज्य सरकारे देखील या रकमेत योगदान देतात, ज्यामुळे ती 2.5 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत होते. भारत सरकारच्या आकडेवारीनुसार, संपूर्ण देशात आतापर्यंत 4 कोटींहून अधिक लोकांना या योजनेअंतर्गत घरे देण्यात आली आहेत.


प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना


प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही मृत्यू झाल्यास विमाधारकाच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत प्रदान करते. तुम्ही फक्त 436 रुपये वार्षिक प्रीमियम भरून या योजनेचा लाभ घेऊ शकता. ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी, तुमचे किमान वय 18 वर्षे निश्चित केले आहे, तर कमाल वय 55 वर्षे निश्चित केले आहे. विमा प्रीमियम खातेदाराच्या खात्यातून स्वयंचलितपणे डेबिट केला जातो. PMJJBY ची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2015-16 दरम्यान करण्यात आली होती.


प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना 


भारतातील मोठ्या लोकसंख्येचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने 2015 मध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू करण्यात आली. यापूर्वी त्याचा वार्षिक प्रीमियम 12 रुपये होता, जो 1 जून 2022 पासून वाढवून 20 रुपये करण्यात आला आहे. या योजनेत तुम्हाला 2 लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण मिळते. जर तुमचे वय 18 ते 70 वर्षांच्या दरम्यान असेल, तर तुम्ही ही संरक्षण विमा योजना खरेदी करू शकता जी वर्षाला फक्त 20 रुपये देऊन 2 लाख रुपयांपर्यंतचे कव्हरेज देते.


आयुष्मान भारत योजना


देशातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने आयुष्मान भारत योजना सुरू केली आहे. या योजनेत आयुष्मान कार्डधारकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळते. औषधे, उपचार आदींचा खर्च सरकार उचलते. या योजनेसाठी पात्र असलेले लोक त्यांचे उपचार आयुष्मान कार्डद्वारे सरकारने सूचीबद्ध केलेल्या रुग्णालयांमध्ये मोफत मिळवू शकतात. या योजनेचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार 'आयुष्मान भव' मोहीम देखील चालवत आहे, ज्या अंतर्गत पात्र लोकांसाठी आयुष्मान कार्ड बनवले जात आहे.


अटल पेन्शन योजना


अटल पेन्शन योजना ही भारतातील नागरिकांसाठी असंघटित क्षेत्रातील कामगारांवर लक्ष केंद्रित करणारी पेन्शन योजना आहे. भारत सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या या पेन्शन योजनेत 18 वर्षे ते 40 वर्षे वयापर्यंत गुंतवणूक करावी लागते. या योजनेद्वारे वयाच्या 60 वर्षानंतर प्रत्येक महिन्याला कमाल 5000 रुपयांपर्यंतचे पेन्शन मिळू शकते. पेन्शनची रक्कम तुमच्या गुंतवणुकीवर अवलंबून असते. भारतातील कोणताही नागरिक APY योजनेत सामील होऊ शकतो. यासाठी त्याचे पोस्ट ऑफिस/बचत बँकेत बचत खाते असावे. तुमच्या ठेवीनुसार सरकार त्यात काही पैसेही टाकते. यानंतर वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर सरकार तुम्हाला पेन्शन देण्यास सुरुवात करते.


जन धन योजना


जन धन योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील लोक बँकांमध्ये शून्य शिल्लक खाती उघडू शकतात. चेकबुक, पास बुक, अपघात विमा याशिवाय सर्वसामान्यांना जन धन बँक खात्यावर ओव्हरड्राफ्टची सुविधाही मिळते. ओव्हरड्राफ्ट सुविधेअंतर्गत, जन धन खातेधारक त्यांच्या खात्यात शिल्लक नसतानाही 10,000 रुपये काढू शकतात. आर्थिक समावेशन हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. म्हणजे देशातील सर्वात गरीब लोकांनाही बँकिंग व्यवस्थेशी जोडता येते. 


महत्वाच्या बातम्या:


महिलांना फायदा मिळवून देणाऱ्या सरकारी योजना कोणत्या? कसा घ्याल योजनांचा लाभ?