कोल्हापूर : राज्यात जागावाटपावरून महायुतीमध्ये ( Mahayuti Seat Sharing in Maharashtra) ठिणग्यांवर ठिणग्या पडत असतानाच आज (8 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) तातडीने दिल्ली गाठणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी हातकणंगले तालुक्यातील कोरोचीमध्ये महिला मेळावा त्यांच्या उपस्थितीत होत आहे. या कार्यक्रमात बोलताना कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री यांना तत्काळ दिल्लीला बोलवलं असून जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. सायंकाळी चार वाजता मुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत. दरम्यान, एका मिनिटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन कोनशीलांचे उद्घाटन केले. 


पुढील दोन दिवसांत महायुतीचं जागावाटप जाहीर होण्याची शक्यता


जागा वाटपाबाबत दिल्लीत आज रात्री महायुतीतीची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. दिल्लीमध्ये अमित शाह, जे पी नड्डा यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील महायुतीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसांत महायुतीचं जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?  


मुख्यमंत्री मेळाव्याला मार्गदर्शन करताना म्हणाले की, या राज्यात आपल्या महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात म्हणून आपण महिला धोरण जाहीर केले. महिला सुरक्षा अभियान आपण सुरू करत आहोत. शहरा शहरांमध्ये माझ्या माय भगिनींना कुठेही अडचण आली, तर ताबडतोब त्यांना मदत पोचली पाहिजे त्यांना संकटातून सोडवलं पाहिजे आणि त्यांना सक्षम करण्यासाठी देखील आज राज्य सरकार अनेक उपक्रम सुरू करत आहे.


नरेंद्र मोदी साहेबांनी करून दाखवलं 


त्यामुळे महिला भगिनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अनेक प्रकारच्या भूमिका यशस्वीपणे राबवतात. त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या मेहनतीमुळे राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीत एक मोलाचा हातभार लागला आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला भगिनी आज या ठिकाणी पुढारी आहेत. देशामध्ये महिला पुरुष समानतेची भूमिका, समानतेच्या वाटेवर आणण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी करून दाखवलं. 


ते पुढे म्हणाले की, नवीन संसद भवनामध्ये दिल्लीच्या पहिलं विधेयक मंजूर झालं ते महिला आरक्षणाचा मंजूर झालं. हिंमत मोदी साहेबांनी दाखवली. उज्वला गॅस योजनेमुळे महिलांच्या अश्रू पुसण्याचे काम केलं. महिलांच्या नावे पक्की घर करून मोदीजींना त्यांना आत्मविश्वास मिळवून दिला. लखपती दीदी, स्टॅन्ड अप इंडिया,  प्रधानमंत्री मुद्रा योजना त्याचबरोबर महिला समृद्धी योजना यासारख्या अनेक योजना देऊन महिलांना बळ देण्याचं काम केलं.निर्भया कायद्यातून महिलांच्या सुरक्षेचा अभिवचन देखील दिलं. आपलं सरकार, केंद्र सरकार मिळून हे डबल इंजिनच सरकार या राज्यामध्ये अनेक योजना महिलांसाठी आपण आणत आहोत, असे ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या