Inflation :  महागाईमुळे देशभरातील सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले आहेत. विशेषत: खाद्यपदार्थांच्या महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. काही काळापासून टोमॅटो आणि हिरव्या भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. दुसरीकडे दुधाच्या दरातही कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्यांना बजेट सांभाळण्यासाठी दूधही जपून वापरावं लागत आहे. 


वर्षभरात अशी झाली दरवाढ


सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात दुधाच्या दरात 10 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. केंद्र सरकारने संसदेला दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी जूनमध्ये टोन्ड दुधाच्या किमती जून 2022 च्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत 9 टक्क्यांनी जास्त होत्या, तर फुल क्रीम दुधाच्या किमती जून 2023 मध्ये आधीच्या वर्षाच्या तुलनेत 10 टक्क्यांनी जास्त होत्या.


सरकारने काय म्हटले?


मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धमंत्री पुरुषोत्तम रुपाला राज्यसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर दिले. 'पीटीआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, मंत्री रुपाला यांनी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात एनडीडीबीच्या आकडेवारीचा हवाला देत सांगितले की, गेल्या तीन वर्षांत दुधाचे दर फारसे वाढलेले नाहीत. ते म्हणाले की, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षांत दुधाच्या दरात फारशी वाढ झालेली नाही.


दूधाच्या दरात वाढ


मात्र, गेल्या वर्षभरातील आकडेवारी वेगळेच चित्र दाखवते. जून 2022 मध्ये टोन्ड दुधाची किंमत 47.40 रुपये प्रतिलिटर होती. आता टोन्ड दूध 51.60 रुपये प्रति लिटर झाले आहे. अशा प्रकारे वर्षभरात टोन्ड दुधाच्या दरात 8.86 टक्के वाढ झाली आहे. दुसरीकडे, फुल क्रीम दुधाच्या बाबतीत जून 2022 मध्ये 58.80 रुपये प्रति लिटरच्या तुलनेत 9.86 टक्क्यांनी वाढून 64.60 रुपये प्रति लिटर झाली आहे.


दूधाच्या दरावर शासनाचे नियंत्रण नाही


मंत्री रुपाला यांनी संसदेत सांगितले की, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग देशातील दुधाच्या दरावर नियंत्रण ठेवत नाही. देशात दूध खरेदी-विक्रीचे नियमन सरकार करत नाही. त्याची किंमत सहकारी आणि खाजगी डेअरी त्यांच्या किंमती आणि बाजार परिस्थितीनुसार निश्चित करतात.


कांदाही महागणार आहे


गेल्या काही महिन्यांत देशातील अनेक खाद्यपदार्थांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. टोमॅटोने अनेक शहरांमध्ये 200 रुपये प्रतिकिलोचा दर ओलांडला असून तो 300 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. हिरव्या भाज्याही खूप महाग आहेत. मसाल्यांच्या किमतीही भडकल्या आहेत. आता पुढील एक-दोन महिन्यात कांद्याचे भाव दुप्पट होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.


इतर महत्त्वाची बातमी