RBI on Inflation : देशातील महागाईचा दर (Inflation Rate) दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जागतिक बाजारात रुपयाची घसरण सुरुच आहे. महागाई दर नियंत्रणात येत नसल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावरील (RBI) दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आरबीआयच्या पतधोरण समितीची अतिरिक्त बैठक बोलावण्यात आली आहे. महागाई दर नियंत्रणात ठेवण्यास आरबीआय अपयशी ठरली आहे. याचसंदर्भात सरकारला उत्तर देण्यासाठी समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. 


महागाई दर नियंत्रणात येत नसल्याने आरबीआयवर दबाव


आरबीआयच्या पतधोरण समितीची अतिरिक्त बैठक 3 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. महागाई दर नियंत्रणात ठेवण्यास आरबीआय अपयशी ठरल्याने यासंदर्भात केंद्र सरकारला उत्तर देण्यासाठी आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक पार पडणार आहे. महागाई दर ठरलेल्या मर्यादेत ठेवण्यात आरबीआयला अपयश आल्याने याबाबत आरबीआयकडून सरकारला अहवाल देत उत्तर दिलं जातं. आरबीआयला महागाई दर 4 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने दिले आहे. पण अनेक प्रयत्न करुनही आरबीआयला महागाई दर 6 टक्क्यांच्या आत रोखण्यात अपयश आले आहे.


महागाई दर 7.41 टक्क्यांवर 


यावर्षी जानेवारीपासून महागाई दर सातत्याने सहा टक्क्यांच्या वर आहे. दरम्यान, पुन्हा एकदा बैठकीत रेपो रेटमध्ये वाढ करण्याचा निर्णय होऊ शकतो, ज्यामुळे नागरिकांच्या ईएमआयमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 30 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत 50 बेसिस पॉईंट्सनं रेपो रेट वाढवला होता, जो 5.9 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर 7.41 टक्के राहिली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये महागाई दर 7 टक्के होता.


रुपयाच्या किमतीत 10 टक्के घसरण


डॉलरच्या (Dollar) तुलनेत रुपयाची (Rupee) घसरण सुरुच आहे. रुपयाने मागील काही दिवसांतील ऐतिहासिक निच्चांक गाठला आहे. गेल्या वर्षभरापासून रुपयाच्या किमतीत सातत्याने घसरण होताना दिसत आहे. यामुळे अर्थतज्ज्ञांनी वेळोवेळी चिंता व्यक्त केली आहे. 2022 वर्षात रुपया 10 टक्क्यांनी घसरला आहे. सध्या रुपयाची किंमत प्रति डॉलर 82.35 आहे. रुपया लवकरच 83 चा आकडा पार करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 2022 मध्ये रुपयाच्या किमतीमध्ये दहा टक्क्यांची घट झाली आहे. याआधी 2014 मध्ये रुपयाच्या किमतीत विक्रमी 40.50 टक्क्यांची घट झाली होती. मे 2014 मध्ये एक डॉलरची किंमत 58.58 रुपये होती, हीच किंमत आता प्रति डॉलर 82.43 रुपये आहे.