मुंबई : इराण-इस्रायल (Iran Israel War) यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगावर चिंतेचे सावट उमटले आहे. जगातले अनेक देश या युद्धामुळे चिंतेत आहेत. दरम्यान, या युद्धासह वेगवेगळ्या जागतिक घडामोडींचा परिणाम जगभरातील शेअऱ बाजारावर (Indian Stock Market) होत आहे. भारतातील शेअर बाजारालाही त्याचा मोठा फकटा बसला आहे. आज भांडवली बाजाराच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
आज भांडवली बाजाराची स्थिती काय?
आज भांडवली बाजाराच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात हाहा:कार उडाला. सकाळी बाजारातील व्यवहार चालू होताच सेन्सेक्समध्ये 727 अंकांची घसरण पाहायला मिळाली. त्यानंतर बाजार हळूहळू सावरला. आज सेन्सेक्सने सर्वाधिक 73, 905.80 पर्यंत उभारी घेतली होती. मात्र आता दिवसाअखेर सेन्सेक्स 845.12 अंकांच्या घसरणीसह 73399.78 अंकांवर स्थिरावला. गेल्या आठवड्यात शुक्रवारी सेक्सेक्स 74244.90 अंकांवर स्थिरावला होता. म्हणजेच शुक्रवारच्या तुलनेत आज सेन्सेक्समध्ये 1.14 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली.
निफ्टी 50 ची स्थिती काय?
निफ्टीचीही अशिच स्थिती आहे. शुक्रवारी निफ्टी निर्देशांक 22519.40 वर बंद झाला होता. आज बाजाराच्या शेवटी निफ्टीमध्ये शुक्रवारच्या तुलनेत 1.10 टक्के म्हणजेच 246.90 अंकांची घसरण पाहायला मिळाली. दिवसाअखेर निफ्टी 22272.50 अंकांवर स्थिरावला.
या कंपन्यांना बसला फटका
सोमवारी शेअर बाजारात हाहा:कार पाहायला मिळाला. निर्देशांक गडगडल्यामुळे अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स गटांगळ्या खाऊ लागले. यात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचाही समावेश आहे. या कंपनीचे शेअर्स 4.8 टक्क्यांनी पडले आहेत. सध्या या कंपनीच्या शेअर्सची किंमत 354.30 आहे. अदाणी ग्रीन एनर्जी (Adani Green Energy Stock) कंपनीचा शेअरदेखील 3.66 टक्के खसरून 1815 रुपयांवर स्थिरावला. आयआरएफसी शेअरही (IRFC Share) 3.48 टक्क्यांपर्यंत खाली आला. सध्या या शेअरची किंमत 140.25 रुपये आहे. या कंपन्यांसह इराण- इस्रायल युद्धामुळे सध्या शेअर बाजाराची स्थिती नाजूक झाली आहे. या स्थितीत अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत.
स्मॉल कॅप कंपन्यांनाही फटका
स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर्सही आज घसरल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये सर्वाधिक फटका एनबीबीसीला (इंडिया) बसला आहे. या कंपनीच्या शेअर्सचे मूल्य 5.73 टक्क्यांनी घटले. सध्या या कंपनीच्या एका शेअरचे मूल्य 125.95 आहे. केईसी इंटरनॅशनलचे (KEC International Stock) शेअर्स 5.71 टक्क्यांनी घरंगळून 704.10 रुपयांवर स्थिरावले. कॅस्ट्रॉल इंडिया (Castrol India Share) कंपनीचा शेअरदेखील 5.66 टक्क्यांनी कमी होत 210.80 रुपयांवर बंद झाला.
हेही वाचा :
आता 'टेस्ला'च्या कारमध्ये 'टाटा'च्या चीप, भारतात येण्याआधी एलॉन मस्क यांनी केला मोठा करार!
हिऱ्याच्या आकाराचा आलिशान बंगला, महागड्या गाड्या, शेतकरीपुत्र हजारो कोटींचा मालक कसा झाला?