Rupee at All time Low: भारतीय चलन रुपयामध्ये सुरू असलेली घसरण थांबण्याची चिन्ह दिसत नाही. रुपयाने पुन्हा एकदा ऐतिहासिक निचांकी दर गाठला आहे. रुपयाचा दर प्रति डॉलर 77.59 रुपये इतका झाला आहे. बाजार सुरू झाल्यानंतर रुपया 77.50 रुपये या दरावर उघडला गेला. त्यानंतर त्यात आणखी घसरण झाली. रुपयाने सोमवारी 9 मे रोजी 77.41 पैसे हा दर गाठला होता. रिझर्व्ह बँकेने 4 मे रोजी रेपो दरात वाढ केली होती. महागाई नियंत्रित करण्यासाठी रेपो दरात वाढ करण्यात आली असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले होते. त्यानंतर शेअर बाजारात आणि रुपयांमध्ये आणखी घसरण सुरू झाली.
आज भारतीय रुपयात 26 पैशांची घसरण नोंदवण्यात आली. बुधवारी रुपया 77.24 रुपये प्रति डॉलर या दरावर बंद झाला होता. त्यानंतर आज सकाळी थेट 26 पैशांची घसरण नोंदवण्यात आली.
डॉलर का वधारला?
अमेरिकेत महागाईने मागील 40 वर्षातील उच्चांक गाठला आहे. एप्रिलमध्ये ही महागाईने 8.3 टक्के इतका दर गाठला. महागाई वाढत असल्यामुळे अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह कडून व्याज दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच्या परिणामी डॉलरचा दर आणखी वधारला आहे. याचा परिणाम जागतिक चलन बाजारावर दिसून येत आहे. मार्च महिन्यात अमेरिकेत 8.5 टक्के इतक्या महागाईची नोंद करण्यात आली. तर, एप्रिलमध्ये महागाईचा दर 8.3 टक्के इतका राहिला. हा दरदेखील मागील 40 वर्षातील उच्चांकी दर आहे.
अमेरिकेतील महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी फेडरल रिझर्व्हकडून आगामी बैठकीत व्याजदरात वाढ होण्याची अटकळ बांधली जात आहे. त्याच्या परिणामी डॉलरची किंमत आणखी वधारू शकते.
रुपयाचा दर घसरल्याने काय परिणाम होणार?
डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर घसरल्याने भारताचा आयात खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कच्च्या तेलासह इतर महत्त्वाच्या वस्तूंची आयात करणे आणखी महाग होणार आहे. त्यामुळे भारताची परकीय गंगाजळी आटण्याची भीती आहे. याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होणार आहे.
पाहा व्हिडिओ: Rupee Value Fall Explained : रुपयाच्या किंमतीत घसरण का?