Rupee Vs Dollar : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाने आज पुन्हा एकदा ऐतिहासिक नीचांक गाठला. डॉलरच्या तुलनेत रुपयाने 79.86 रुपयांचा स्तर गाठला होता. त्यानंतर काही वेळाने रुपया सावरला असून सध्या 79.84 रुपयाच्या स्तरावर दिसत आहे. बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपयांने 79.81 चा स्तर गाठला होता. 


अमेरिकन डॉलर आणखी मजबूत होत असताना दुसरीकडे परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री यामुळे रुपयात घसरण सुरू आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतलेल्या काही धोरणात्मक निर्णयामुळे रुपया काही प्रमाणात सावरत असल्याचे चित्र होते. मात्र, आता रुपयाची घसरण प्रति डॉलर 80 रुपये होण्याची शक्यता आहे. 


इंटरबँक फॉरेन करेन्सी एक्सचेंज बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीसह 79.84 रुपयांवर व्यवहार करत आहे. त्याआधी 79.86 च्या नीचांकी स्तरापासून फक्त दोन पैशांनी वधारला आहे. 


या दरम्यान अमेरिकन डॉलरची स्थिती दर्शवणारा डॉलर इंडेक्स 0.30 टक्क्यांनी वधारत 108.30 वर आला आहे. ग्लोबल ऑइल इंडेक्स ब्रेंट क्रूड वायदे बाजारात 0.57 टक्क्यांनी वधारत 100.14 डॉलर प्रति बॅरल इतका झाला. 


शेअर बाजारातील आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बुधवारी  2,839.52  कोटींच्या शेअर्सची विक्री केली आहे. 


डॉलर वधारल्याने काय परिणाम होणार?


कच्च्या तेलाची आयात: भारत कच्च्या तेलाची सर्वाधिक आयात करतो. भारतातील इंधनाची गरज भागवण्यासाठी 80 टक्के कच्चे तेल आयात केले जाते. सरकारी इंधन कंपन्यांकडून डॉलरमध्ये कच्च्या तेलाची खरेदी केली जाते. रुपयाच्या तुलनेत डॉलर महाग झाल्यास भारतीय इंधन कंपन्यांना कच्चे तेल खरेदी करण्यासाठी अधिक डॉलर मोजावे लागतील. 
 
परदेशातील शिक्षण महाग: परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खर्चातही वाढ होणार आहे. परदेशातील शिक्षण आणि तेथील वास्तव्याचा खर्च आणखी महाग होण्याची शक्यता आहे. जून ते ऑगस्ट दरम्यान प्रवेश प्रक्रिया सुरू होते. त्यावेळी डॉलरची किंमत वाढते. डॉलरचा दर वधारल्यास पालकांवर आणखी आर्थिक बोजा पडण्याची शक्यता आहे.


मोबाईल लॅपटॉप महाग होणार: ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून सु्ट्टे भाग परदेशातून आयात केले जातात. मोबाईल, लॅपटॉपमध्ये वापरण्यात येणारे अनेक सुट्टे भाग परदेशातून येतात. त्यामुळे रुपयाची घसरण झाल्यास आयात महाग होणार आहे.