India Crude Oil:  रशियाकडून स्वस्त दरात कच्च्या तेलाची (Crude Oil) खरेदी केल्यामुळे देशातील तेल शुद्धीकरण कंपन्यांना मोठा फायदा झाला आहे. स्वस्त दरात कच्च्या तेलाची आयात केल्यामुळे या कंपन्यांनी 14 महिन्यांत 7 अब्ज डॉलरची बचत केली आहे. स्वस्त दरात कच्च्या तेलाची आयात करूनही भारतीय ग्राहकांना स्वस्त दरात पेट्रोल डिझेल (Petrol Diesel Price)  मिळाले नाही. 


रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे अमेरिकेने रशियावर आर्थिक निर्बंध लादले होते. तेव्हा रशियाने आपल्या अर्थव्यवस्थेला कोणत्याही बाह्य धक्क्यापासून वाचवण्यासाठी भारताला स्वस्तात कच्चे तेल देण्याची ऑफर दिली. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. भारताने ही ऑफर लगेचच स्वीकारली. 'इंडियन एक्सप्रेस'च्या वृत्तानुसार,  एप्रिल 2022 ते मे 2023 या 14 महिन्यांत देशातील तेल शुद्धीकरण कंपन्यांनी रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल खरेदी केल्यामुळे सुमारे 7 अब्ज डॉलरचे परकीय चलन वाचले आहे.


भारत कच्च्या तेलाचा जगातील तिसरा सर्वात मोठा आयातदार आहे. भारत आपल्या 85 टक्के इंधनाच्या गरजा भागवण्यासाठी आयातीवर अवलंबून आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 139 डॉलरपर्यंत पोहोचली होती. यानंतर भारताने रशियाकडून स्वस्त दरात कच्चे तेल आयात करण्यास सुरुवात केली. पूर्वी रशिया भारताला अत्यंत कमी कच्च्या तेलाची निर्यात करत असे. मात्र या सवलतीमुळे रशिया भारताला कच्च्या तेलाचा सर्वात मोठा पुरवठादार बनला.


वृत्तानुसार, एप्रिल 2022 ते मे 2023 दरम्यान भारताचे एकूण कच्च्या तेलाचे आयातीचे बिल 186.45 अब्ज डॉलर इतके आहे. भारताने हेच कच्चे तेल दुसऱ्या पुरवठादार देशाकडून आयात केले असते तर भारताला 196.62 अब्ज डॉलर इतकी रक्कम मोजावी लागली असती. भारताने रशियाकडून 40 अब्ज डॉलरचे कच्चे तेल आयात केले आहे. भारताला हे कच्चे तेल  79.75 डॉलर प्रति बॅरल या दराने मिळाले आहे. इतर देशांच्या तुलनेने  सरासरी किंमतीपेक्षा प्रति बॅरल 14.5 डॉलरने स्वस्त आहे.


या 14 महिन्यांत भारताच्या एकूण आयातीत रशियाचा वाटा 24.2 टक्के होता. काही वेळातच, रशियाने इराक आणि सौदी अरेबियासारख्या पुरवठादार देशांची जागा घेतली. इराक आणि सौदी अरेबियाकडून भारताला सर्वाधिक जे भारताला सर्वाधिक कच्च्या तेलाचा पुरवठा करत होते. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: