Major points from the T20 squad selection : वेस्ट इंडिजमध्ये 3 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट यादरम्यान होणाऱ्या पाच सामन्याच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. हार्दिक पांड्या याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आलेय तर सूर्यकुमार यादव याला उपकर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे. 15 जणांच्या चमूमध्ये काही युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर काही खेळाडूंचे पुनरागमन झालेय.
युवा खेळाडूंना संधी -
आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या काही युवा खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळाले आहे. यामध्ये यशस्वी जायस्वाल आणि तिलक वर्मा यांचा समावेश आहे. तिलक वर्मा याने आयपीएलमध्ये राजस्थानच्या संघासाठी प्रभावी कामगिरी केली होती, तर मुंबईसाठी तिलक वर्मा संकटमोचक झाला होता. या दोन खेळाडूंना संधी देत निवड समितीने मोठे पाऊल उचलले आहे.
यांना डावलले -
ऋतुराज गायकवाड, जितेश शर्मा आणि रिंकू सिंह यांना टी 20 साठी टीम इंडियात स्थान देण्यात आले नाही. ऋतुराज गायकवाड वनडे संघाचा भाग आहे, पण टी20 मध्ये त्याला स्थान मिळाले नाही. त्याशिवाय पंजाबसाठी दमदार कामगिरी करणाऱ्या विदर्भाच्या जितेश शर्मा याचीही निवड करण्यात आलेली नाही. पाच चेंडूवर सलग पाच षटकार मारत देशभरात गाजलेला रिंकू यालाही निवड समितीने डावलले आहे. शार्दूल ठाकूर याच्या नावाचाही विचार करण्यात आला नाही.
यांचं पुनरागमन -
संजू सॅमसन, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह यांचे संघात पुनरागमन झाले आहे. मागील काही दिवसांपासून यांना संघात स्थान मिळत नव्हते. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केल्याचं बक्षीस यांना मिळाले आहे.
सिनिअर खेळाडूंना आराम -
हार्दिक पांड्याकडे नेतृत्व देत निवड समितीने सिनिअर खेळाडूंना आराम दिला आहे. आशिया कप आणि वर्ल्डकप या दोन मोठ्या स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे निवड समितीने सिनिअर खेळाडूंना आराम दिला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज या पाच महत्वाच्या खेळाडूंना आराम देण्यात आला आहे.
विकेटकिपर -
इशान किशन आणि संजू सॅमसन या दोघांना विकेटकिपर म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. इशान किशन फलंदाजीत सलामीची जबाबदारी पार पाडू शकतो. अशामध्ये यशस्वी जायस्वाल याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळेल का ? याबाबत शंका आहे. शुभमन गिल याच्यासोबत सलामीला कोण येणार ? याची चर्चा सुरु झाली आहे.
वेगवान गोलंदाजीची धुरा कुणाच्या खांद्यावर ?
भारतीय संघात चार वेगवान गोलंदाज निवडण्यात आले आहे. यामध्ये अर्शदीप सिंह, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार यांचा समावेश आहे. यांच्या जोडीला हार्दिक पांड्या असेल.
फिरकीमध्ये कोण कोण ?
चार फिरकी गोलंदाजांना भारतीय संघात स्थान दिले आहे. रवि बिश्नोई याचे पुनरागमन झालेय. तर कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांचीही निवड करण्यात आली आहे. अक्षर पटेल याचे संघातील स्थान निश्चित मानले जातेय. भारतीय संघात किती फिरकी गोलंदाजांना खेळव्यात येणार ? याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
भारतीय संघ -
इशान किशन (विकेटकिपर) , शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उप कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकिपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार
टी 20 सामन्याचे वेळापत्रक (संध्याकाळी 8 वाजता)
3 ऑगस्ट 2023 - पहिला टी20 सामना
ब्रायन लारा क्रिकेट अॅकेडमी, त्रिनिदाद
6 ऑगस्ट 2023 - दुसरा टी20 सामना
नॅशनल स्टेडिअम, गयाना
8 ऑगस्ट 2023 - तिसरा टी20 सामना
नॅशनल स्टेडिअम, गयाना
12 ऑगस्ट 2023 - चौथा टी20 सामना
सेन्ट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियम, फ्लोरिडा
13 ऑगस्ट 2023 - पाचवा टी20 सामना
सेन्ट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियम, फ्लोरिडा