Employees Salary Hike: एका बाजूला आर्थिक मंदीच्या सावटामुळे नोकरकपातीचा वरंवटा फिरवला जात असताना, दुसरीकडे भारतातील नोकरदार वर्गासाठी काहीशी सकारात्मक बातमी समोर आली आहे. वर्ष 2023 मध्ये भारतीय कर्मचाऱ्यांची वेतन वाढ दुहेरी आकड्यात होणार असल्याचा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, ही वाढ गेल्या वर्षीच्या 10.4 टक्क्यांच्या वाढीपेक्षा कमी असेल. ही वाढ सर्व क्षेत्रातील नोकऱ्यांशी संबंधित असणार असल्याचा अंदाज आहे. 


कोणत्या कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार?


'फ्युचर ऑफ पे'  च्या सर्वेक्षण अहवालानुसार, भारतीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 10.2 टक्के इतकी पगार वाढ अपेक्षित आहे. तंत्रज्ञानाशी संबंधित प्रमुख तीन क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारात विक्रमी वाढ होऊ शकते. त्याच वेळी, ई-कॉमर्स क्षेत्रात सर्वाधिक 12.5 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे अहवालात नमूद केले आहे.  ई-कॉमर्स क्षेत्रातील व्यावसायिक कर्मचाऱ्यांच्या पगारात 11.9 टक्के आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारात 10.8 टक्के वाढ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 


2022 मध्ये कोणत्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झाली?


 2021 मधील 14 टक्के पगार वाढीच्या तुलनेत 2022 मध्ये 15.6 इतकी पगार वाढ होती. वित्तीय संस्थांनी सर्वाधिक सरासरी 25.5 टक्के सरासरी पगार वाढ केली होती. दुसरीकडे, एकूणच टेलिकम्युनिकेशन उद्योगाने सरासरी 13.7 टक्के अधिक पगार वाढ केली होती. ही पगार वाढ कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर आधारीत होती. 


AI, ML आणि क्लाउडमध्ये अधिक मागणी


'फ्युचर ऑफ पे'  च्या अहवालानुसार, भारतात काही सेक्टरमधील नोकऱ्यांमध्ये अधिक मागणी राहण्याची शक्यता आहे. यामध्ये अक्षय्य ऊर्जा, ई-कॉमर्स क्षेत्र, डिजिटल सेवा, आरोग्य सेवा, दूरसंचार, शिक्षण सेवा, किरकोळ आणि लॉजिस्टिक आणि वित्तीय तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. या सेक्टरमध्ये कर्मचार्‍यांचा विकास आणि कर्मचार्‍यांचे पगार वाढवण्यावर लक्ष केंद्रित करू शकतात. त्याचवेळी,  एआय, एमएल आणि क्लाउडमध्ये मनुष्यबळाची जास्त मागणी आहे.


डेटा आर्किटेक्चर, सॉफ्टवेअर इंजिनियर आणि अन्य कर्मचाऱ्यांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, चांगला पगार मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


यंदाच्या वर्षात मोठी नोकरकपात 


2023 या वर्षात मोठ्या संख्येने लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अवघ्या तीन महिन्यांत 500 हून अधिक कंपन्यांनी 1.48 लाख जणांना कामावरुन कमी केले आहे. नोकर कपात करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत Meta, Amazon, Microsoft या बहुराष्ट्रीय कंपन्यांसह भारतातील मोठ्या कंपन्यांचादेखील समावेश आहे.