मुंबई: कॉर्पोरेट घराण्यांना बँका स्थापन करण्याची परवानगी देण्यात यावी या आरबीआयच्या एका पॅनेलने केलेल्या शिफारशीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि विरल आचार्य यांनी टीका केली आहे. या दोघांनी लिहलेल्या एका संयुक्त लेखात सध्याच्या परिस्थितीत कॉर्पोरेट घराण्यांना बँका स्थापन करण्याची परवानगी देणे हा एक चुकीचा विचार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतंच एका पॅनेलची स्थापना करुन भारतीय बँकिंग व्यवस्थेतील बदलासंदर्भात अभ्यास करुन शिफारसी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार संबंधित पॅनेलने कॉर्पोरेट घराण्यांना बँका स्थापन करण्याची परवानगी देण्यात यावी अशी एक शिफारस केली आहे. यावर रघुराम राजन आणि विरल आचार्य यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लिंक्डइनवर एक संयुक्त लेख लिहून या शिफारशीला विरोध केला आहे. तसेच भारतीय बँकिंग व्यवस्था नुकतीच IL&FS आणि येस बँकेच्या धक्क्यातून सावरायचा प्रयत्न करत असताना आरबीआयच्या पॅनेलने केलेल्या या शिफारशीच्या टायमिंगवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
सध्याच्या परिस्थितीत आरबीआयने कॉर्पोरेट घराण्यांना बँका स्थापन करण्याची परवानगी देण्याचा विचार सोडून द्यावा असं मत रघुराम राजन आणि विरल आचार्य यांनी व्यक्त केलं आहे. भारतीय बँकिंगचा इतिहास तितकासा चांगला नाही, जर बँकांच्या मालकांवरच कर्ज असेल तर ती बँक कर्जाचे वितरण कशा प्रकार करेल असाही प्रश्न रघुराम राजन आणि विरल आचार्य यांनी उपस्थित केला आहे.
काय आहे शिफारस?
भारतीय बँकिंग व्यवस्थेतील बदलासंदर्भात आरबीआयच्या एका इंटरनल वर्किंग ग्रुपने काही शिफारशी केल्या आहेत. यात खासगी बँकात प्रमोटर्सच्या भागीदारीत वाढ करण्यात यावी अशी एक शिफारस करण्यात यावी. तसेच कॉर्पोरेट घराण्यांना बँका स्थापन करण्याची परवानगी देण्यात यावी अशीही शिफारस केली आहे.
महत्वाच्या बातम्या: