शिर्डी : अहमदनगर जिल्हा बँकेच्या राहुरी तालुक्यातील सोनगाव शाखेत सोने तारण प्रकरणी मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. तब्बल अडीच कोटी रुपयांचे सोने तारण करून कर्ज घेतलेले सोने बनावट निघाले असून नेमकं यातील दोषी कोण याबाबत चौकशी सुरू झाली आहे. कर्जदार व बँकेचा सुवर्ण पारखी यांनी संगनमताने ही फसवणूक केल्याचा बँकेचा संशय असून याची चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
जिल्हा सहकारी बँकेच्या सोनगाव (ता. राहुरी) शाखेतील सोनेतारण केलेल्या 191 पैकी तब्बल 134 कर्जदारांचे सुमारे अडीच कोटी रुपयांच्या कर्ज वसुलीचे सोन्याचे दागिने बनावट आढळल्यानंतर खळबळ उडाली असून 57 कर्जदारांनी सोन्याचे दागिने सोडविल्याने बँकेची सुमारे 50 लाख रुपयांची वसुली झाली असली तरी बनावट सोने गहाण ठेवलेल्या 134 कर्जदार व सोनगाव शाखेचा सुवर्णपारखी (सराफ) यांच्यावर बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
मागील वर्षी बँकेचे व्यवस्थापक म्हणून प्रवीण पवार यांनी चार्ज घेतल्यानंतर सोनेतारण कर्जात अनियमितता आढळून आली अनेकांना नोटीस पाठवून वसुली होत नसल्याने अखेर जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयातील सरव्यवस्थापक राजेंद्र शेळके यांच्या अधिपत्याखाली सोनगाव शाखेतील सोनेतारण दागिन्यांची सत्यता पडताळणी नुकतीच पूर्ण झाली. राहुरी येथे जिल्हा बँकेच्या तालुका विकास अधिकारी कार्यालयात बँकेचे अधिकारी, सहकार खात्याचे प्रतिनिधी, पोलीस, कर्जदार यांच्यासमक्ष गहाण दागिन्यांची पिशवी उघडून बँकेने नियुक्त केलेल्या सुवर्णपारखी (सराफ) यांनी 191 कर्जदारांच्या दागिन्यांची सत्यता पडताळणी केली यातील 57 जणांनी कर्ज व व्याजाची रक्कम भरून, दागिने सोडवून घेतले. त्यांच्या दागिन्यांची सत्यता पडताळणी करण्यात आली नाही. मात्र आम्ही खर सोन ठेवले असल्याचा दावा आता इतर अनेक कर्जदारांनी केला असून याबाबत त्यांनी बँकेला निवेदन ही दिलं आहे.
सोनगाव शाखेतील सोनेतारण कर्जाच्या प्रकरणी बनावट सोने आढळलेले 134 कर्जदार व सोनगाव शाखेतील सुवर्णपारखी यांच्यावर बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी चौकशी सुरू केल्याची माहिती शाखेचे व्यवस्थापक प्रवीण पवार यांनी दिली. या सर्व प्रकारात नेमकं कर्जदारांनी बँकेला फसवले की मुख्य सुवर्ण पारखी असलेल्या सोनाराने कर्जदारांशी संगनमत करून करून बँकेची फसवणुक केली आहे का? व या सर्व प्रकाराला बँकेतील कोणाची साथ आहे का याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी चौकशीनंतर यातील सत्यता नक्की बाहेर येईल.