Wedding Season: भारतातील (India) सणांचा हंगाम नुकताच संपला आहे. आता लवकरच लग्नाचा हंगाम सुरु होणार आहे. उद्यापासून म्हणजे 23 नोव्हेंबरपासूव यावर्षीचा लग्नाचा सीझन (Wedding Season) सुरु होणार आहे. 23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2023 यादरम्यान लग्नाचा हंगाम असणार आहे. यार्षीच्या हंगामात जवळफास 38 लाखांहून अधिक लग्ने होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 


देशात सुमारे 4.74 लाख कोटी रुपयांची उलाढाल होणार


या लग्नाच्या हंगामात देशात 38 लाखांहून अधिक लग्ने होतील असा अंदाज आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं होणाऱ्या विवाहांमुळं, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या व्यापाऱ्यांच्या गटाने यावेळी देशात सुमारे 4.74 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय अपेक्षित असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गतवर्षीबद्दल बोलायचे तर नोव्हेंबर-डिसेंबर 2022 च्या लग्नाच्या हंगामात देशभरात 32 लाखांहून अधिक विवाह झाले होते. या काळात सुमारे 3.75 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झाला होता. यावर्षी मात्र,  4.74 लाख कोटी रुपयांची उलाढाल होणार आहे. 


व्यापार्‍यांना यावर्षी मोठ्या व्यवसायाची अपेक्षा 


विशेष म्हणजे यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर देशभरातील व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नफा कमावला आहे. यानंतर 23 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या लग्नसराईच्या हंगामात यंदा देशाच्या विविध भागांत एकूण 38 लाखांहून अधिक विवाह सोहळे होणार असल्याची व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत या लग्नसराईच्या हंगामात व्यवसायात प्रचंड वाढ दिसून येईल. एकूण व्यवसाय 4.74 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे.


दिल्लीत सर्वाधिक 4 लाखांहून अधिक विवाह होणार 


कॅटचे ​​सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार या लग्नाच्या मोसमात एकट्या राजधानी दिल्लीत 4 लाखांहून अधिक लग्ने होणार आहेत. अशा परिस्थितीत एकट्या दिल्लीत  एकूण 1.25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय अपेक्षित आहे. यासोबतच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या लग्नसराईत 1 लाख कोटींचा अधिक व्यवसाय अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले. 


लग्नसराईत सोन्याला मोठी मागणी 


लग्नसराईत सोन्याला मोठी मागणी असते. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी होणार आहे. देशात सोन्याची वार्षिक मागणी सुमारे 800 टन आहे. त्यातील निम्म्याहून अधिक खरेदी लग्नासाठी केली जाते. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक असलेला देश आहे. टायटन कंपनीच्या तनिष्क, सेन्को गोल्ड लिमिटेड, त्रिभोवन दास भीमजी झवेरी लिमिटेड आणि कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड यांना या काळात सर्वाधिक फायदा होण्याची अपेक्षा आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


VIDEO: हनिमूनला बायकोने छोटे कपडे घातले म्हणून मागितला घटस्फोट; वकिलांनी सांगितली घटस्फोटाची अजब कारणं