India Export Basket : जागतिक व्यापारातील मंदीच्या काळात भारताला निर्यातीच्या (Export) आघाडीवर दिलासा मिळाला आहे. जागतिक व्यापार मंदीच्या (global recession) काळात चालू आर्थिक वर्षात काही क्षेत्रातील भारताची निर्यात चांगली झाली आहे. निर्यातीच्या बाबतीत भारताला दिलासा देणार्या क्षेत्रांमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू, फार्मास्युटिकल्स आणि लोहखनिज ही क्षेत्र प्रमुख आहेत. एका अहवालात याबाबतची माहिती दिली आहे. या क्षेत्रांतील निर्यात चांगली झाली असली तरी इतर काही प्रमुख क्षेत्रांतील निर्यात एकतर स्थिर राहिली आहे किंवा घटली आहे. अशा विभागांमध्ये मौल्यवान दगड आणि दागिने, पेट्रोलियम उत्पादने आणि अभियांत्रिकी वस्तूंचा समावेश आहे.
या वस्तूंच्या निर्यातीत वाढ
निर्यातीच्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात 17.73 अब्ज डॉलर होती. गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा हे प्रमाण 23.88 टक्के अधिक आहे. गेल्या वर्षी याच काळात 14.37 अब्ज डॉलर्सच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात झाली होती. त्याचप्रमाणे, या कालावधीत औषधांची निर्यात 8.09 टक्क्यांनी वाढून 16.56 अब्ज डॉलर झाली आहे. लोह खनिजाची निर्यात 204.4 टक्क्यांनी वाढून 2.07 अब्ज डॉलर झाली आहे.
या विभागातील निर्यात कमी
दुसरीकडे, समीक्षाधीन कालावधीत, अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात कमी होऊन 69.41 अब्ज डॉलर झाली आहे. जी एका वर्षापूर्वी 70.5 अब्ज डॉलर होती. पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीत मोठी घसरण झाली आहे. ती एका वर्षापूर्वी 60.26 अब्ज डॉलरवरुन 52.71 अब्ज डॉलरवर आली आहे. जेम्स अँड ज्वेलरी सेगमेंटमध्ये हा आकडा 26.45 बिलियनवरुन डॉलरवरुन 21.41 बिलियन डॉलरवर आला आहे.
जागतिक व्यापारावर परिणाम करणारे घटक
गेल्या वर्षी अनेक कारणांमुळे जागतिक व्यापार प्रभावित झाला होता. पूर्व युरोपमध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध, अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार तणाव आणि युरोपच्या कार्बन करामुळे व्यापार विस्कळीत झाला होता. अलीकडच्या काही महिन्यांत इस्रायल-हमास युद्धामुळं व्यवसायावर परिणाम होत आहे. त्यामुळं लाल समुद्र आणि सुएझ कालव्याद्वारे होणाऱ्या जागतिक व्यापारावर परिणाम होत आहे.