India Crude Oil:  रशियाने युक्रेनसोबत (Russia Ukraine War) युद्ध सुरू केल्यानंतर अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी रशियावर (Russia) आर्थिक निर्बंध लादले आहेत. आर्थिक निर्बंधांचा उद्देश रशियन उत्पन्नाचा स्रोत कमी करणे आहे. यासाठी युरोपीयन देशांनी रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे बंद केले आहे. अशा स्थितीत भारताने रशियाकडून स्वस्त दरात कच्च्या तेलाची खरेदी सुरू केली आहे. रशियाकडून स्वस्तात खरेदी केलेल्या कच्च्या तेलाचे भारत नेमकं करतो काय, याचा उलगडा करणारा दावा करण्यात आला आहे. 


सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (CREA) च्या अहवालानुसार, रशियावर लादण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे युरोपीय देश भारत, चीन, तुर्की, यूएई आणि सिंगापूर या देशांकडून मोठ्या प्रमाणात रशियन तेल खरेदी करत आहेत. युरोपीय देशांना रशियन तेल विकणाऱ्या या पाच देशांना अहवालात 'लँड्रोमॅट' देश म्हटले आहे. या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणजेच या पाच देशांमध्ये भारताने सर्वाधिक रशियन तेलाची निर्यात केली आहे.


रशियाकडून खरेदी केलेल्या कच्च्या तेलाची इतर देशांना विक्री


युरोपीयन देश फिनलँडची राजधानी हेलसिंकी येथील CREA ने प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार, 2023 च्या पहिल्या तिमाहीत, भारत हा लॉन्ड्रॉमॅट देशात आघाडीवर आहे. भारत हा रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो आणि त्याचे शुद्धीकरण करतो. त्यानंतर युरोपियन निर्बंधांकडे दुर्लक्ष करून त्याची विक्री करतो. 


'ब्लूमबर्ग'चा अहवाल आणि एनालिटिक्स फर्म 'केप्लर'चा अहवालही CREA च्या अहवालाशी मिळताजुळता आहे. युरोपियन युनियनचे सदस्य देश जे रशियन तेलावरील किंमत मर्यादा लागू करण्यास समर्थन देतात आणि निश्चित मर्यादेपेक्षा जास्त तेल व्यापार आणि विमा प्रतिबंधित करतात. तेच देश भारत, चीन, तुर्कस्तान, यूएई आणि सिंगापूर यांच्याकडून रिफाइंड तेल खरेदी करत असल्याकडे अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. 


भारतीय तेल कंपन्या आणि युरोपियन खरेदीदारांनी किंमती मर्यादा टाळल्याचा आरोप केला आहे. गुजरातमधील रिफायनरी रशियन तेलाचे शुद्धीकरण करून ते युरोपीय देशांना विकण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. रशियन तेल कंपनी रोझनेफ्ट ही गुजरातमधील एका रिफायनरी कंपनीमधील भागिदार आहे. 


रशियावर लादलेल्या आर्थिक निर्बंधांकडे दुर्लक्ष करून भारत रशियन तेलाची मोठ्या प्रमाणात आयात करत आहे. गेल्या सलग सहा महिन्यांपासून रशिया भारताला तेल पुरवठा करण्यात अव्वलस्थानी आहे.  अहवालानुसार, जे युरोपीयन देश रशियाकडून थेट कच्च्या तेलाची खरेदी करत असे, असे देश आता तिसऱ्या देशांकडून तेल खरेदी करत आहेत. 


'लँड्रोमॅट' देशांपैकी भारताने एप्रिल महिन्यात सर्वाधिक रशियन तेल आयात केले आहे. सलग पाचव्या महिन्यात भारताने रशियाकडून सर्वाधिक कच्च्या तेलाची खरेदी केली आहे. 


भारताची डिझेल निर्यात तीन पटीने वाढली 


युक्रेन युद्धानंतर भारताची डिझेल निर्यात तीन पटीने वाढली आहे. मार्च 2023 मध्ये भारताने जवळपास 1,60,000 बॅरल प्रति दिन डिझेल निर्यात केली आहे. सध्या भारत आणि युरोपीयन युनियनमध्ये सुरू असलेल्या व्यापारात डिझेल निर्यात महत्त्वाचा घटक राहिला आहे. 


CREA च्या अहवालानुसार, गुजरातमधील सिक्का आणि वाडीनार या दोन बंदरांमधून सर्वाधिक तेल उत्पादनांची निर्यात केली जात आहे. रिलायन्सच्या मालकीच्या जामनगर रिफायनरी आणि वाडीनार येथील नायरा एनर्जीकडून ही डिझेल निर्यात होते. नायरा एनर्जी कंपनीमध्ये रशियन कंपनी रोझनेफ्ट जवळ 49.13 टक्के भागिदारी आहे. दोन्ही बंदरे रशियन तेल उद्योगासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. 


दरम्यान, या अहवालावर भारत सरकारने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.