ICICI Bank Profit News : देशातील दुसरी सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या ICICI बँकेने कमाईचा विक्रम केला आहे. चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत बँकेच्या नफ्यात 14.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. म्हणजे फक्त तीन महिन्यात बँकेला 11746 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. 


दिवाळीपूर्वी देशातील बहुतांश कंपन्या आणि बँकांचे निकाल जाहीर होत आहेत. आता देशातील दुसरी सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या ICICI बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत त्यांच्या नफ्यात कमालीची वाढ झाल्याची माहिती दिली आहे. या कालावधीत बँकेच्या नफ्यात वार्षिक आधारावर 14.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ICICI बँकेने दिलेल्या माहितीनुसार, जुलै-सप्टेंबर तिमाहीत तिचा निव्वळ नफा 14.5 टक्क्यांनी वाढून 11746 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत बँकेचा नफा 10,261 कोटी रुपये होता.


व्याजातून मिळणारे उत्पन्न वाढलं


बँकेने दिलेल्या माहितीनुसार, जुलै ते सप्टेंबरमध्ये बँकेचे एकूण उत्पन्न वाढून 47,714 कोटी रुपये झाले होते. जे गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 40,697 कोटी रुपये होते. केवळ व्याजातून बँकेचे उत्पन्न वाढून 40,537 कोटी रुपये झाले, जे गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 34,920 कोटी रुपये होते. त्याच वेळी, बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 9.5 टक्क्यांनी वाढून 20,048 कोटी रुपये झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ते 18,308 कोटी रुपये होते. व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे.


बँक कर्जाच्या गुणवत्तेत सुधारणा


या कालावधीत आयसीआयसीआय बँकेने वितरीत केलेल्या कर्जाची माहिती आणि त्याचा दर्जाही शेअर केला आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीच्या अखेरीस, बँकेचा ढोबळ NPA (नॉन-परफॉर्मिंग ॲसेट) त्याच्या एकूण कर्ज अग्रिमाच्या 1.97 टक्क्यांवर आला. एका वर्षापूर्वी बँकेचा एकूण NPA 2.48 टक्के होता. अशा स्थितीत बँकेचा निव्वळ एनपीए 0.42  टक्क्यांवर आला, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीअखेर 0.43 टक्के होता. एकत्रित आधारावर बँकेच्या निव्वळ नफ्यात 19 टक्क्यांनी सुधारणा झाली आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीत ते 12,948 कोटी रुपयांवर पोहोचले, जे गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 10,896 कोटी रुपये होते. भारतीय रिझर्व्ह बँकेने ICICI बँकेला देशातील 3 प्रमुख बँकांमध्ये स्थान दिले आहे. RBI च्या Too Big To Fail या श्रेणीमध्ये त्याचा समावेश आहे. SBI आणि HDFC बँक या दोनच बँकांची नावे या श्रेणीत येतात.


महत्वाच्या बातम्या:


RBI: आयसीआयसीआय बँकेला 1 कोटींचा तर येस बँकेला 91 लाखांचा दंड, आरबीआयचा दोन्ही बँकांना दणका, कारण...