Chanda Kochhar: ICICI बँकेच्या (ICICI Bank) माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर (Chanda Kochhar), त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉनचे संस्थापक वेणुगोपाल धूत यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. ICICI बँकेनं व्हिडिओकॉन समूहाला दिलेल्या 1 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम नॉन परफॉर्मिंग अॅसेट (NPA) झाली आहे. जेव्हा कर्जदार कर्ज घेतलेली रक्कम परत करू शकत नाही, तेव्हा बँकेचे पैसे अडकतात आणि नंतर ती रक्कम बँक एनपीए म्हणून घोषित करते.
CBI कडून 10 हजार पानांची चार्टशीट दाखल
10 हजारहून अधिक पानांच्या आरोपपत्रात सीबीआयनं आरोप केलाय की, चंदा कोचर यांच्यावर आयसीआयसीआय बँकेची जबाबदारी सोपवली होती. बँकेच्या एमडी आणि सीईओ झाल्यानंतर एक मे 2009 पासून व्हिडिओकॉन ग्रुपला सहा 'रुपी टर्म लोन' (RTL) मंजूर केलं होतं. आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे की, जून 2009 ते ऑक्टोबर 2011 दरम्यान, बँकेनं समूहाला एकूण 1,875 कोटी रुपयांचं RTL मंजूर केलं होतं.
षडयंत्र रचून घेतलं कर्ज
चंदा कोचर या त्या दोन सदस्यीय संचालक समितीच्या अध्यक्षा होत्या, ज्यांनी ऑगस्ट 2009 मध्ये व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (VIEL) ला 300 कोटी रुपयांचा RTL मंजूर केला होता. सीबीआयनं पुढे सांगितलं की, हे मुदत कर्ज मंजूर करुन गुन्हेगारी कट रचण्यात आला. 26 ऑगस्ट 2009 रोजी, कोचर यांच्या अध्यक्षतेखालील संचालकांच्या समितीनं व्हिडीओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला 300 कोटी रुपये मंजूर केले. कर्जाची रक्कम 7 सप्टेंबर 2009 रोजी वितरित करण्यात आली होती.
कोण आहेत चंदा कोचर? (Know about Chanda Cocchar)
- वयाच्या 22 व्या वर्षापासून बँकिंग क्षेत्रात पदार्पण केलेल्या चंदा कोचर वयाच्या 47 व्या वर्षी सीईओ बनल्या
- त्या भारतातील बँकेची सीईओ बनणाऱ्या पहिल्या महिला बनल्या
- त्याआधी बँकेच्या काॅर्पोरेट आणि रिटेल बॅंकिंगची जबाबदारी त्यांच्याकडेच होती
- काही काळ त्या बँकेच्या सीएफओ पदावर देखील होत्या
- 2009 साली एमडी आणि सीईओ पदाची जबाबदारी मिळाल्यावर फोर्ब्सच्या यादीत 100 पैकी 20 व्या स्थानावर होत्या
- जगातील शक्तीशाली महिलांच्या यादीत भारतात सोनिया गांधींनंतर कोचर यांना स्थान देण्यात आलं होतं
- 2011 साली भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं
प्रकरण नेमकं काय?
साल 2009 ते 2011 दरम्यान आयसीआयसीआय बँकेनं व्हिडिओकॉन समूहाला सुमारे 1875 कोटींचं कर्ज दिलं होतं. मात्र या आर्थिक व्यवहारांमध्ये गैरप्रकार केल्याचा आरोप कोचर यांच्यावर करण्यात आला. याबाबत प्रारंभी बँकेने कोचर यांची बाजू घेतली होती. मात्र सीबीआयने तपास सुरू केल्यावर बँकेने भूमिका बदलली आणि जून 2018 मध्ये निवृत्त न्यायमूर्ती बी.एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली होती. या प्रकरणामुळे चंदा कोचर यांना बँकेचं सीईओपद सोडावं लागलं होतं. बँकेच्यावतीने देण्यात आलेल्या नियमबाह्य कर्जामुळे बँकेला आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे, असे सांगण्यात येते. याप्रकरणी चंदा कोचर यांचे पती दिपक कोचर आणि व्हिडिओकॉनचे वेणुगोपाल धूत यांच्याविरोधात सीबीआयनं 22 जानेवारी 2019 रोजी गुन्हा नोंदविला आहे.