Agriculture News : देशातील 15 राज्यांतील 78 जिल्ह्यांमध्ये मका उत्पादन (Maize Production) वाढवण्याची मोहीम सुरु झाली. शेतकऱ्यांना (Farmers) सुधारित वाणांचे बियाणे वाटप करण्यात येत असून सुधारित मका उत्पादनाचे प्रशिक्षण दिले जात आहे. इथेनॉलच्या (Ethanol) उत्पादनासाठी मकेला मोठी मागणी आहे. त्यामुळं भारतीय कृषी संशोधन परिषद (Indian Council of Agricultural Research) उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे.


मकेचं महत्त्व वाढलं


आता बदलत्या काळात, मकेचं महत्त्व आणखी वाढले आहे. कारण ते केवळ मानवी अन्नासाठी उपयुक्त नाही तर ते आता पोल्ट्री उद्योगासाठी देखील उपयुक्त आहे. आता ते एक ऊर्जा पीक म्हणून देखील खूप वेगाने उदयास येत आहे. कारण मकेपासून इथेनॉल निर्माण केलं जात आहे. हे इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळले जात आहे. त्यामुळे देशातील पेट्रोलियमची आयात कमी होऊन शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेतकरी केवळ अन्नदाताच नाही तर ऊर्जा प्रदाताही होणार आहे. परंतू मकेचे आवश्यक तेवढे उत्पादन होत नाही. अशा परिस्थितीत पुरेशा प्रमाणात उत्पादनाची गरज आहे.


आतापर्यंत DHM-117 आणि DHM-121 वाणांचे 3000 किलो बियाणे वितरित 


केंद्र सरकारनं 'इथेनॉल उद्योगांच्या पाणलोट क्षेत्रात मका उत्पादन वाढ' हा प्रकल्प सुरू केला आहे. ज्याची जबाबदारी ICAR अंतर्गत भारतीय मका संशोधन संस्थेला (IIMR) देण्यात आली आहे. या अंतर्गत मक्याचे उत्पादन वाढवण्यात येणार आहे. या मोहिमेत एफपीओ, शेतकरी, डिस्टलरी आणि बियाणे उद्योग यांना एकत्र घेऊन काम केले जाणार आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांचे बियाणे वाटप करण्यात येत आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत DHM-117 आणि DHM-121 वाणांचे 3000 किलो बियाणे वितरित करण्यात आले आहे.


या 15 राज्यात वाढणार मकेचं उत्पादन?


या प्रकल्पाचे नेतृत्व करणाऱ्या आयआयएमआरचे वरिष्ठ मका शास्त्रज्ञ डॉ. एस.एल. जाट यांनी या प्रकल्पाबाबत माहिती दिली आहे. या प्रकल्पांतर्गत भारतातील 15 राज्यांमध्ये 15 क्लस्टर तयार करण्यात आली आहेत. याअंतर्गत 78 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. तिथे मक्याचे उत्पादन वाढवण्याची मोहीम राबविली जाणार आहे. या 15 राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, आसाम, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, उत्तराखंड, कर्नाटक आणि हरियाणा यांचा समावेश आहे. याअंतर्गत 1500 एकरात मका पेरायची आहे. त्यापैकी खरीप 2024 हंगामासाठी 1140 एकर क्षेत्राचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी सर्व संबंधित जिल्ह्यांमध्ये सुधारित बियाणांचे वाटप करण्यात येत आहे. आत्तापर्यंत बायोसीड सोबत, DMH 117, DMH 122, DMRH 1308, पायोनियर 3401, पायोनियर 3396, DKC 9144, DKC 9133 आणि DKC 9178, Corteva, Bioseed, Bayer सारख्या कंपन्यांच्या बियांचा देखील समावेश करण्यात आला आहे.


कमी पाण्यात मकेचं जास्त उत्पादन


सरकारला इथेनॉलचे उत्पादन वाढवायचे आहे, असे भारतीय मका संशोधन संस्थेचे संचालक डॉ.हनुमान सहाय जाट यांनी सांगितले. यासाठी मक्याच्या अधिक उत्पादनाची गरज आहे. केंद्र सरकारने 2025-26 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. इथेनॉल प्रामुख्याने ऊस, मका आणि कापणी केलेल्या तांदळापासून तयार केले जाते. पण ऊस आणि भात पिकांना जास्त पाणी लागते, तर मक्याला फार कमी पाणी लागते. त्यामुळे इथेनॉलसाठी कॉर्न वापरणे चांगले आहे. यासाठी, IIMR 15 राज्यांतील 78 जिल्ह्यांमधील 15 पाणलोट क्षेत्रात सर्वोत्तम व्यवस्थापन पद्धती आणि सुधारित वाणांचा प्रसार करत आहे, जेणेकरून मक्याचे उत्पादन वाढेल.


मका उत्पादनात 10 दशलक्ष टन वाढ करण्याचे सरकारचे लक्ष 


कृषी मंत्रालयाने पुढील पाच वर्षांत मका उत्पादनात 10 दशलक्ष टन वाढ करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. याचे कारण म्हणजे पोल्ट्री फीडसाठी मक्याची मागणी वाढत असून इथेनॉल उत्पादनासाठी उत्पादन वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. कृषी मंत्रालयाच्या मते, 2022-23 मध्ये खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात 380.85 लाख मेट्रिक टन म्हणजेच सुमारे 38 दशलक्ष टन मक्याचे उत्पादन झाले आहे. यात वाढ करणे ही काळाची गरज आहे. 


महत्वाच्या बातम्या:


10 ते 12 लाख टन साखर इथेनॉल उत्पादनासाठी वापरण्यास मान्यता द्या, ISMA ची सरकारकडे मागणी