Gold Buying : दिवाळीच्या  (Diwali) पार्श्वभूमीवर जळगावच्या (Jalgaon) सुवर्ण नगरीमध्ये सोने खरेदीचा मुहूर्त मानला जातो. या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी आज जळगावमध्ये मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील वर्षी असलेल्या सोन्याच्या दरापेक्षा यंदा 20 हजार रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळत  आहे. तरी काल असलेल्या सोन्याच्या दरा पेक्षा आज सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची घट झाल्याने ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला मिळाला आहे. आज जळगावमध्ये सोन्याचे दर जी एस टी शिवाय 79200 रुपये आहेत तर जीएसटी सह 81500 दर आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार धनत्रयोदशीला देशात 20 हजार कोटी रुपयांचे सोने विकले आहे. 


लक्ष्मी पूजन दिवशी सोने खरेदी करणं शुभ


दिवाळीच्या पार्शवभूमीवर लक्ष्मी पूजन दिवशी सोने खरेदी ही शुभ असते. बरकत  देणारे असते, अशी ग्राहकांची श्रद्धा असल्याने अनेक ग्राहक थोडे का होईना सोने खरेदी करत असतात. धनत्रयोदशीला देशभरात 20 हजार कोटी रुपयांचे सोने विकले आहे. चांदीच्या खरेदीतही मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या खरेदीत थोडी घट झाली आहे. कारण धनत्रयोदशीला सोन्याचे भाव कमी होतील अशी अपेक्षा लोकांना होती पण तसे झाले नाही. मात्र, चांदीच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. याशिवाय धनत्रयोदशीच्या दिवशी इतर बाजारपेठांमध्ये उत्साह होता. सोने-चांदीशिवाय वाहने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, भांडी, कपडे यासह अन्य उत्पादनांची चांगली खरेदी-विक्री झाली. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAT) नुसार, यावर्षी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर 60 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय अपेक्षित आहे. तर गेल्या वर्षी उलाढाल 50 हजार कोटी रुपये होती, जी 20 टक्के अधिक आहे.


20,000 कोटी रुपयांच्या सोन्याची विक्री 


धनत्रयोदशीच्या दिवशी बहुतेक लोक सोने-चांदीची खरेदी करतात (Gold-Silver Price), त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदीची खरेदी वाढते. यावेळच्या धनत्रयोदशीला सोन्या-चांदीची चांगली विक्री झाली आहे. देशभरातून 20 हजार कोटी रुपयांचे सोने आणि 2500 कोटी रुपयांची चांदी खरेदी करण्यात आली. अंदाजे 30 टन सोने विकले गेले, ज्याची किंमत 20 हजार कोटींहून अधिक आहे. त्याच वेळी, 250 टन चांदीची विक्री झाली आहे, ज्याची किंमत 2500 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तर गेल्या वर्षी सोन्या-चांदीचा मिळून सुमारे 25 हजार कोटींचा व्यवसाय होता.


सोन्याची विक्री 15 टक्क्यांनी घसरली


मिळालेल्या माहितीनुसार, चांदीची विक्री 33 टक्क्यांनी वाढली आहे, तर सोन्याची विक्री 15 टक्क्यांनी कमी झाली आहे. चांदी ही अधिक व्यावहारिक गुंतवणूक मानली जाते. धनत्रयोदशीला सोन्याची विक्री 35 टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा होती. मागील वर्षी 42 टनांपेक्षा कमी आहे. गेल्या दिवाळीपासून सोन्याच्या दरात 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 


वाहन विक्रीत 25 टक्क्यांची वाढ 


वाहन उद्योग संस्था FADA च्या मते, धनत्रयोदशीच्या दिवशी कार आणि दुचाकी विक्रीमध्ये 20 ते 25 टक्के वाढ झाली आहे. दसऱ्याच्या काळात ही वाढ पाच ते बारा टक्के होती. दिवाळीत विक्रीचा हा आकडा दुप्पट होऊ शकतो. धनत्रयोदशीच्या दिवशी कारच्या विक्रीत 10 टक्के आणि दुचाकींच्या विक्रीत 15 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे.