मुंबई : वयाच्या 25-30 व्या वर्षी बहुसंख्य तरुण-तरुणी लग्नाचा निर्णय घेतात. या वयात लग्न करण्याचं प्रमाण जास्त असलं तरी अनेकजण याच वयात आर्थिक नियोजनाबाबत अनभिज्ञ असतात. आता तर पैसे खर्च करण्याचा काळ आहे, आताच बचत कशाला करायला हवी, असा अनेकजण विचार करतात. मात्र लग्न झाल्यानंतर आर्थिक नियोजनाबाबत गांभीर्याने विचार केला पाहिजे. तसे न केल्यास भविष्यात मोठे आर्थिक संकट उभे राहू शकते. याच कारणामुळे लग्न झाल्यानंतर कोण-कोणत्या पाच गोष्टी आवर्जून करायला हव्यात, हे जाणून घेऊ या...
1- सर्वांत अगोदर खर्च होणाऱ्या पैशांचा हिशोब ठेवा
नोकरीची सुरूवात असो किंवा लग्न झाल्यानंतरचा सुरुवातीचा काळ असो, अनेकजण मौज-मजा करण्यातच जास्त पैसे खर्च करतात. मौज-मजा करणे वाईट नाही. मात्र आयुष्याचा आनंद घेताना तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त पैसे तर खर्च करत नाहीयेत ना? हे पाहणं फार गरजेचं आहे. लग्नानंतर पगारातील बराच मोठा भाग, किंवा कमाईपेक्षा जास्त पैसे मौजमजेवर खर्च होत असतील, तर भविष्यात तुम्ही आर्थिक अडचणीत सापडू शकता. त्यामुळेच लग्न झाल्यानंतर तुम्ही खर्च करत असलेल्या पैशांचा हिशोब ठेवा. प्रमाणापेक्षा अधिक पैसे खर्च होणार नाहीत, याची काळजी घ्या.
2- बचत करण्यावर लक्ष केंद्रीत करा
लग्न झाल्यानंतर होणाऱ्या खर्चात वाढ होते. लग्नानंतर अनेकजण पैशांकडे न बघता कोणताही विचार न करता खर्च करतात. मात्र वेगवेगळ्या गोष्टींसाठी पैसे खर्च करण्यासोबतच पैशांची बचत करण्यावरही लक्ष केंद्रीत करायला हवे. कारण मुलं झाल्यानंतर खर्च आणखी वाढतो. त्यामुळे आता बचत केलेला पैसा भविष्यात तुमच्या मदतीला येऊ शखतो. त्यामुळे आतापासूनच बचतीवर लक्ष केंद्रीत करा.
3. निवृत्तीचे नियोजन आतापासूनच करा
तारुण्याच्या काळात अनेकजण निवृत्तीचं नियोजन करत नाहीत. वयाचे 50 वर्षे पूर्ण झाल्यावर निवृत्तीचं नियोजन करू, असा अनेकांचा दृष्टीकोन असतो. मात्र असा विचार करणे चुकीचे आहे. ऐन तारुण्यापासूनच तुम्ही निवृत्तीचे नियोजन करायला हवे. नोकरीला लागल्यानंतर तुम्हाला निवृत्तीचे नियोजन करणे शक्य न झाल्यास कमीत कमी लग्न झाल्यानंतर तरी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. कारण जेवढ्या लवकर तुम्ही निवृत्तीनंतरच्या चरितार्थासाठी पैसे जमवाल, तेवाढेच अधिक पैसे तुम्हाला निवृत्तीनंतर मिळतील. वेगवेगळ्या योजनांत गुंतवणूक करून तुम्ही निवृत्तीसाठी पैसे जमूव शकता.
4. घर घेण्याची हीच योग्य वेळ
प्रत्येकालाच आपले, स्वत:चे घर असावे असे वाटते. लग्नापर्यंत तुम्हाला तुमचे स्वत:चे घर घेणे शक्य न झाल्यास लग्नानंतर लवकरात लवकर घर खरेदी करण्याचा प्रयत्न करा. कारण भविष्यात मुलं झाल्यानंतर शाळा, वैद्यकीय खर्च अशा स्वरुपात होणारा खर्च वाढतो. त्यामुळे भविष्यात घर घेणे कठीण होऊ शकते. लग्न झाल्यानंतर लगेच मूल जन्माला घालण्याचा तुमचा विचार नसेल, तर तुमचा होणारा खर्च कमी असतो, त्यामुळे फारशी आर्थिक ओढाताण न होऊ देता, तुम्हाला घर खरेदी करता येऊ शकते.
5. फिरण्यासाठी एक फंड तयार करा
पर्यटणाला जाऊन वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देणे प्रत्येकालाच आवडते. लग्न झाल्यानंतर तर अनेकजण दरवर्षी ट्रीपला जातात. मात्र लग्नानंतर तुमच्यावर इतरही जबाबदाऱ्या वाढू शकतात. जबाबदाऱ्या वाढल्यामुळे तुम्हाला फिरायला जाणे अशक्यही होऊ शकते. अशी अडचण होऊ नये म्हणून लग्नानंतर फिरण्यासाठी एक वेगळा फंड तयार करण्याचा प्रयत्न करा. हळूहळू फंड तयार केल्यामुळे तुम्हाला फिरायला जाणं हा आर्थिक बोझा वाटणार नाही. त्यामुळे आतापासूनच फिरण्यासाठी फंड तयार करा.
हेही वाचा :
आणखी एक IPO आला रे, लिस्टिंगच्या आधीच सगळीकडे चर्चा, GMP वर तुफान प्रतिसाद!